Friday, April 19, 2024

/

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच करू हस्तक्षेप – आमटे

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तेंव्हा जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच हस्तक्षेप करून त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगताना समिती नेत्यांची कृती वावगी नसल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी आज अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले.

बेळगाव महापालिकेसमोर उभारण्यात आलेल्या अनाधिकृत लाल-पिवळ्या ध्वजावरून सध्या वातावरण तापले आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा आज सकाळी शिनोळीनजीक कोल्हापूर महाराष्ट्रातील शिवसेना नेते कार्यकर्ते आणि कर्नाटक पोलिस यांच्यात संघर्ष झाला. तसेच कोल्हापूरचे शिवसेना नेते विजय देवणे व संजय पोवार यांनी गनिमी काव्याने सीमाभागात शिरून कोणेवाडी (ता. बेळगाव) गावामध्ये भगवा ध्वज फडकविला.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विशेष करून कन्नड पत्रकारांनी म. ए. समितीने लाल-पिवळ्या ध्वजाच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. आमटे यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रातील शिवसेना व अन्य पक्षांच्या नेत्यांनी सीमाभागात प्रवेश करू नये यासाठी बेळगांव शहर आणि तालुक्यात त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला असून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.Dcp vikram aamte

महाराष्ट्रातील संबंधित नेत्यांनी शहर व्याप्तीमध्ये प्रवेश केलेला नाही. त्याप्रमाणे त्यांनी शहरासह बेळगाव तालुक्यात प्रवेश करू नये यासाठी प्रत्येक प्रवेशमार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना तेथेच रोखुन माघारी धाडण्याची व्यवस्था केली जाईल. शिनोळी येथे जो संघर्ष झाला त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळाले आहे ते पाहून पुढील कार्यवाही केली जाईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिवसेनेसह महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनी आमच्या हद्दीत प्रवेश करू नये अशी विनंती आम्ही केली आहे, असेही पोलीस उपायुक्त डॉ. आमटे यांनी सांगितले.

कन्नड ध्वजा विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे म. ए. समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना तसे कांही करता येणार नाही, कारण ते आमच्याशी बोलले आहेत. त्यांनी कालच आमच्यामुळे कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले आहे. आता ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास गेले आहेत अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली.

मोर्चासाठी आवाहन करणाऱ्यांवर कारवाई करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना तशी कारवाई करता येत नाही असे अप्रत्यक्ष सुचविताना पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी कायदा व सुव्यवस्था भंग होत असेल तरच आम्ही हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करू. सध्या समितीच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.