सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या कार्यकारणी संदर्भातील वाद जनतेच्या न्यायालयात न सुटल्यामुळे आता नाईलाजाने आम्ही विद्यमान कार्यकारणीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे, अशी माहिती सार्वजनिक वाचनालयाचे माजी पदाधिकारी व आजीव सभासद प्रा. आनंद मेणसे यांनी दिली.
शहरात आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्राण्यांचे यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमान बेकायदा कार्यकारणीच्या विरोधात मुख्य जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असल्याचे सांगून प्रा आनंद मेणसे पुढे म्हणाले की, सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारिणीची जी निवडणूक झाली असल्याचे जे सांगितले जात आहे ती निवडणूक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण आम्हीही वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सभासद आहोत. वाचनालयाची सर्वसाधारण बैठक होईपर्यंत आम्ही सभासद होतो. मात्र सर्वसाधारण बैठकीसंदर्भातील कोणतीही नोटीस आम्हाला देण्यात आलेली नाही.
त्यामुळे झालेली कार्यकारणीची निवड ही बेकायदेशीर असून ती रद्दबादल करावी, अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे केली आहे. तसेच सध्याचे कामकाज सुरू आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सर्वांना विश्वासात न घेता जी बेकायदा कार्यकारिणी निवडण्यात आली आहे त्यांना आता कोणतेही नवे सभासद करून घेता येणार नाहीत. कर्मचाऱ्यांच्या पगारावर व्यतिरिक्त अन्य आर्थिक व्यवहार होऊ नयेत अशी भूमिका आम्ही न्यायालयासमोर मांडली आहे, असे प्रा. आनंद मेणसे यांनी सांगितले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायमूर्तीनी सर्व दावा वाचून ऑर्डरही काढली आहे. दावा दाखल करून घेण्यात आला याचा अर्थ आमचे म्हणणे त्यांनी मान्य केले आहे. त्यानुसार आज दिवसभरात कार्यकारिणीच्या सर्व सभासदांना नोटीस जारी झाली आहे. जे कोण परगावी आहेत त्यांनी संध्याकाळी नोटीस ताब्यात घेऊ असे सांगितले आहे. आमच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार 16 सभासदांपैकी 13 सभासदांनी नोटीस स्वीकारली असून उर्वरित तिघेजण ती लवकरच स्वीकारणार आहेत, असेही प्रा मेणसे यांनी स्पष्ट केले.
आता खुद्द न्यायालयानेच नोटिसा बजावल्यामुळे आमच्या विरोधकांना त्याचे उत्तर द्यावेच लागेल. जनतेच्या न्यायालयात म्हणजे आजीव सभासदांसमोर कार्यकारणी संदर्भातील वाद मिटावा अशी आमची खूप इच्छा होती. परंतु विरोधकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे नाईलाजाने आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावले लागले आहेत. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून ते आम्हाला निश्चितपणे न्याय देईल, असा आम्हाला भरवसा आहे, असेही शेवटी प्रा. आनंद मेणसे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेप्रसंगी कृष्णा शहापूरकर, प्रकाश मरगाळे, सदानंद सामंत,गुणवंत पाटील,विकास कलघटगी आदी उपस्थित होते.