नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेदरम्यान झालेली गैरसोय लक्षात घेऊन कर्नाटक कुस्ती संघटनेचे पदाधिकारी व प्रशिक्षक यांच्यात समन्वय साधावा आणि कुस्तीपटू यांचे नुकसान टाळावे अशी मागणी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने केली आहे.
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील उपाध्यक्ष अप्पाया अप्पण्णावर व सेक्रेटरी सुधीर बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. नवी दिल्ली येथे हे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या कर्नाटक कुस्तीपटुंची गैरसोय होऊन त्यांचे बरेच हाल झाले. बेळगाव जिल्ह्यातून अनेक कुस्तीपटू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.
मात्र नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेदरम्यान कुस्ती प्रशिक्षक नसणे, पैलवानांची तिकिटे रद्द होणे यासारखे प्रकार घडल्यामुळे मोठ्या बिकट परिस्थितीला तोंड देत कुस्तीपटुंना स्पर्धेत सहभाग दर्शवावा लागला. कर्नाटक राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आणि कुस्ती प्रशिक्षक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला आहे. तेंव्हा अशी परिस्थिती भविष्यात पुन्हा उद्भवू नये याची खबरदारी घेतली जावी. यासाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि प्रशिक्षकांमध्ये समन्वय साधला जावा. याव्यतिरिक्त बेळगाव जिल्ह्यामध्ये वरिष्ठ राष्ट्रीय आणि कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड चांचणी घेतली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी चेतन बुद्दण्णावर, बाहुबली पाटील, माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू एम. आर. पाटील, रत्नकुमार मठपती हनुमंत पाटील, बसवराज नाईक आदींसह बरेच पैलवान बंधू उपस्थित होते.