कोरोनाच्या विविध चांचण्यांसाठी आरोग्य खात्याने नुकतेच सुधारित दर पत्रक जाहीर केले आहे. यापत्रकानुसार सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात कोविड -19 आरटी -पीसीआर चांचणीसाठी नमुने पाठवल्यानंतर 500 रु. शुल्क आकारले जाईल, तर थेट खासगी रुग्णालयात चांचणीसाठी गेल्यानंतर 800 रु. शुल्क घेतले जाईल, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
रासायनिक पदार्थांची उपलब्धता आणि इतर बाबींचा विचार करून खाजगी रुग्णालयातील कोविड चांचणी संदर्भातील दर निश्चित करण्यात आले आहेत. चांचणीसाठी आवश्यक घटकांचे दर कमी झाल्याने कोरोना चांचणीचे दर कमी केले जावेत अशी शिफारस राज्याच्या कोविड -19 सल्लागार समितीने केली होती.
त्यानुसार दर कमी करण्यात आले आहेत. आरटी -पीसीआर चाचण्यांसाठी रुग्ण सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आणि तेथून नमुने खाजगी रुग्णालयात पाठविल्यानंतर चांचणी शुल्क 500 रु. निश्चित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे एखादी व्यक्ती खाजगी रुग्णालयात कोरोना चांचणीसाठी दाखल झाल्यास या चांचणीसाठी आता 800 रु. द्यावे लागणार आहेत.
खाजगी प्रयोगशाळा किंवा खासगी रुग्णालयात रॅपिड ॲन्टीजन चांचणीसाठी 400 रु. शुल्क निश्चित केले आहे. तसेच रॅपिड अँटीबॉडी चांचणीसाठी 500 रु. शुल्क असेल. यापूर्वी सदर चाचण्यांसाठी अनुक्रमे 800 ते 1,200 रु. घेतले जात होते.
परंतु आता चांचणी प्रक्रियेत सुधारणा झाल्याने सल्लागार समितीच्या शिफारशीवरून कोरोना चांचणीचे दर कमी करण्यात आले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अप्पर मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी याबाबतचा आदेश बजावला आहे.