रविवार दिनांक 17 जानेवारी रोजी गृहमंत्री अमित शहा हे बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांच्या एकदिवसीय बेळगाव दौऱ्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरण्यात आलेच शिवाय एकदिवसीय दौऱ्यासाठी सरकारी खजिन्यावर लाखोंचा भार देण्यात आला, हे ही नसे थोडके.
गेल्या 8 दिवसांपासून गृहमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरू होती. संपूर्ण शहरात स्वागत कमानी उभारण्यात आल्या. पताका लावण्यात आल्या. अधिक पोलीस कुमक मागविण्यात आली. वाहतुकीच्या मार्गात बदल देखील करण्यात आला. बेळगावमध्ये आगमन झाल्यानंतर गृहमंत्री बागलकोटला हेलिकॉप्टर मधून रवाना झाले. आणि पुन्हा बेळगावला आल्यानंतर सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी भेट देऊन जिल्हा क्रीडांगणावरील कार्यक्रमात सहभागी झाले.
या साऱ्या धावपळीत सर्वसामान्य बेळगावकर मात्र मेटाकुटीला आले. संपूर्ण बेळगाव शहरात सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याने जनतेची चांगलीच तारांबळ उडाली. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे जनतेला संपुर्ण शहराची सहल करावी लागली.
दुपारनंतर शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रमाणही अधिक जाणवले. अनेक ठिकाणी बंद रस्ते आणि पोलीस बंदोबस्तामुळे शहरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यादरम्यान प्रत्येक व्यक्तीकडून ढिसाळ नियोजन आणि जनतेला वेठीस धरण्याच्या प्रकारावरून प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मुतगा गावात महामार्गालगत सांबरा आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकरी, छोटे भाजी विक्रेते आठवडी बाजारासाठी जमा होतात.
सांबरा येथे गृहमंत्र्यांचे आगमन होणार होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने हा आठवडी बाजार रद्द करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. सध्या प्रत्येक माणूस आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण आर्थिक स्रोतासाठी धडपड करत आहे.
याच अनुषंगाने या भागातील आठवडी बाजार नियोजित ठिकाणापासून साधारण 400 मीटर दूर अंतरावर भरवण्यात आला. परंतु याठिकाणी आलेल्या विक्रेत्यांवर लाठी उगारून पोलिसांनी त्यांना वेठीला धरत हुसकावून लावले. ज्या शिवरायांचा आदर्श पंतप्रधान मोदी मांडतात त्याच शिवरायांच्या राज्यात रयतेचा विचार सर्वप्रथम व्हायचा. परंतु आधुनिक विचारांच्या अशा दिग्गज नेत्यांना सर्वसामान्य जनतेचा यत्किंचितही विचार नाही.
कोरोनाच्या नावाखाली लग्न, समारंभ, जत्रा, यात्रा आशा अनेक गोष्टींवर निर्बंध आले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपण्याची मार्गसुची जाहीर करण्यात आली. परंतु याच सरकारच्या नियमावलीत अशा राजकीय कार्यक्रमात स्वतःच ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसविण्यात येऊन पायमल्ली करण्यात आली. आजच्या जनसमावेश मेळाव्यात लाखो लोकांची उपस्थिती होती. मग याठिकाणी कोरोनाची धास्ती सरकार, पोलीस आणि प्रशासनाला नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या जनसमावेश मेळाव्यात अनेक ठिकाणाहून जनता सामील झाली होती. परंतु या जनतेचीही या कार्यक्रमात गैरसोय झाली. जेवणाची सोय नसल्याने अनेकांना रिकाम्या पोटी परतावे लागले. सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील जवळपास सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे इतर ठिकाणी कोणती पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध झाली नाही.
भाजपच्या याच मंत्रिमंडळातील केंद्रीय परिवहन मंत्री, महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी हे अशा गोष्टींना फाटा देतात. आपल्यासाठी सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरात यावी, आणि सर्वसामान्य जनतेला आपल्यामुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्यासाठी लागणारी सुरक्षा सेवादेखील ते कमीतकमी वापरण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला सरकारी कार्यक्रमासाठी नव्हे तर पक्षाच्या राजकीय कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर देऊन, सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण शहराला वेठीला धरणारे केंद्रीय गृहमंत्री यांचा आदर्श घेतील का? केवळ पक्ष बळकटीसाठी कोविड सारख्या संकटकाळात गृहमंत्र्यांचा इतका आटापिटा कशासाठी? असा खोचक प्रश्नदेखील आज बेळगावकर कुजबुजताना दिसून आले.