ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतदान करून भाजप उमेदवारांना विक्रमी संख्येने निवडून देणाऱ्या जनतेने आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत देखील 75 टक्क्यापेक्षा जास्त भाजप उमेदवारांना निवडून द्यावे. कारण वरती नरेंद्र मोदी आणि इथे बी. एस. येडियुरप्पा हे “डबल इंजिनच” सर्वांगीण विकास साधून कर्नाटकला तारू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
बेळगाव दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जनसेवक मेळावा आज आज सायंकाळी जिल्हा क्रीडांगणावर उस्फुर्त प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी बोलताना अमित शहा उपरोक्त प्रतिपादन केले. प्रारंभी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन भाजपच्या उपस्थित नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचे अभिनंदन केले. मुंबई -कर्नाटकच्या या बेळगावच्या भूमीने राणी कित्तूर चन्नम्मा व संगोळी रायण्णा यांच्यासारखे थोर स्वातंत्र्यवीर देशाला दिले आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील या भूमीमधील या पहिल्या दोन हुतात्म्यांना कोण विसरू शकेल? याच भूमीतील बेळवडी मल्लंमा यांच्या शौर्याने तर खुद्द छ. शिवाजी महाराज देखील दंग झाले आणि जिंकलेले राज्य त्यांनी मल्लंमाना परत केले. कन्नड आणि मराठी भाषेचा या भूमीत सुंदर मिलाफ पहावयास मिळतो. भारताची अखंडता येथूनच घोषित होते. देशाच्या संगीत क्षेत्रांमध्ये या भूमीतील सवाई गंधर्व, गंगुबाई हनगल, भीमसेन जोशी आदी दिग्गज कलाकारांचे योगदान मोठे आहे, असे शहा यांनी सांगितले.
दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी हे माझे परम मित्र होते. त्यांच्याकडून पक्षाला खूप मोठ्या आशा होत्या. ते दिग्गज नेता बनण्याच्या मार्गावर होते, परंतु दुर्दैवाने काळाला ते मान्य नव्हते असे सांगून कै. सुरेश अंगडी यांच्यासह राजू चिकनगौडर व रवी हिरेमठ या दिवंगत युवा भाजप नेत्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली.
भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आमदार नवीनकुमार कटील आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला जे घवघवीत यश मिळाले त्याला तोड नाही. राज्यात 55 टक्क्यापेक्षा जास्त जागा भाजपाने जिंकल्या. याबद्दल मी समस्त जनतेचा आभारी आहे, असे सांगून गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. भाजपने देशाच्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. पूर्वीसारखे कोणी भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही. पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकद्वारे आम्ही ते जगाला दाखवून दिले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसला जे जमू शकले नाही, त्या सर्व गोष्टी भाजप करत आहे. 70 वर्षे भिजत पडलेले अनेक प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निकालात काढले जात आहेत. गेल्या सहा-सात वर्षात देशाचे चित्र बदलले आहे.
जम्मू-काश्मीरमधील ज्या 370 व 335 या कलमांना हात लावायची कोणाची हिम्मत होत नव्हती ती दोन्ही कलमे नरेंद्र मोदी यांनी उखडून टाकली आहेत. त्यामुळे काश्मीर हे आता पूर्णता भारताचे अविभाज्य अंग झाले आहे. गेल्या 550 वर्षापासून जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत असलेल्या अयोध्या येथील श्री राम मंदिराचा शिलान्यास पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. आता लवकरच अयोध्येमध्ये गगनचुंबी श्री राम मंदिर साकार होईल. मुस्लिम महिलांवरील तीन तलाकांचा अन्याय पंतप्रधानांनी दूर केल्यामुळे मुस्लिम भगिनींना दिलासा मिळाला आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस कायमच भाजपच्या विरोधात गरळ ओकत आले आहे. त्यांच्या नेत्यांना विचारा दहा वर्षात सोनिया आणि मनमोहन यांच्या सरकारने कर्नाटकाला काय दिले? 13व्या वित्ती आयोगात किती पैसे कर्नाटकला दिले? मी सांगतो तेराव्या वित्त आयोगातून काँग्रेसने कर्नाटकला 28 हजार 583 कोटी रुपये विकासासाठी दिले होते. याउलट 2014 ते 2019 पर्यंत 14 व्या वित्त आयोगातून भाजपने कर्नाटकला 2 लाख 19 हजार 506 कोटी रुपये दिले आहेत.
काँग्रेसकडून आश्वासनखेरीज कांहीच झालेले नाही. काँग्रेसने देशातील गरिबी हटाओ नव्हे तर गरीबांनाच हटविण्याची योजना आखली होती. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 कोटी गरिबांना बँकेची खाती उघडून देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यास सुरुवात केली आहे. 13 कोटी गरीबांच्या घरोघरी गॅस पोहोचला आहे, तर 60 कोटीहून अधिक लोकांना आयुष्यमान योजने अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च मोदी सरकारकडून दिला जाणार आहे, असे शहा यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले जात असले तरी कोरोनाच्या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. सर्वांनी कोरोना लसीकरण करून घेऊन स्वतःला सुरक्षित करावे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे लढाई लढत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे असे सांगून आगामी तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीमध्येही जनतेने भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केली. भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणेने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन वेळा बेळगावचा उल्लेख करताना “मुंबई -कर्नाटकातील” बेळगाव असा केला हे विशेष होय.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे देखील यावेळी समयोचित भाषण झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी प्रास्ताविक भाषण केले. आजच्या जनसेवक मेळाव्यास जिल्ह्यातील भाजपचे सर्व नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य आणि पदाधिकारी -कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित असल्यामुळे जिल्हा क्रीडांगण गर्दीने तुडुंब भरले होते.