बेळगावच्या सांबरा विमानतळाची दिवसेंदिवस प्रगती होत असून या विमानतळावर अनेक ठिकाणांसाठी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक उड्डाण भरणाऱ्या विमानतळांपैकी बेळगाव येथील सांबरा विमानतळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ३४२०१ प्रवाशांनी एकूण ७२७ विमानांद्वारे वाहतूक केली आहे.
अजूनही अनेक ठिकाणांसाठी नव्या विमानसेवा सुरु करण्याच्या तयारीत असलेल्या बेळगाव विमानसेवेने नव्या उच्चांकासह पुन्हा भरारी घेतली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ६०२ विमानांच्या उड्डाणाची नोंद करण्यात आली असून २०२० मध्ये ७२७ विमानांनी उड्डाण भरले आहे. याचप्रमाणे डिसेंबर २०१९ मध्ये ३२५७१ प्रवाशांनी बेळगाव विमानतळाहून सेवेचा लाभ घेतला होता तर डिसेंबर २०२० मध्ये ३४२०१ प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत एकूण १,५५,८४२ प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे.
‘उडाण’द्वारे होणारी विमानांची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली असून बेळगाव विमानतळावरून होणाऱ्या विमानांच्या आणि यासोबतच प्रवाशांच्या वाहतुकीचे उच्चांक देखील वाढत चालले आहेत. दररोज सरासरी २८ विमाने उड्डाण भारत असून बेळगाव मधून तब्बल ११ शहरांसाठी हि विमानसेवा सुरु आहे. येत्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२१ मध्ये या विमानसेवेत पुन्हा दोन ठिकाणांचा समावेश होईल. परंतु अद्याप या विमानतळावर मोठ्या विमानांची सेवा सुरु झाली नसून अनेक प्रवासी बोईंग सारख्या विमानसेवा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.
बेळगावचे विमानतळ हे उत्तर कर्नाटकातील केवळ सर्वाधिक उड्डाण भरणारे विमानतळ नसून सर्वाधिक व्यस्त असणाऱ्या विमानतळाच्या यादीत मोडले जाते. राज्यातील बंगळूर आणि मंगळूर सोबत सर्वाधिक सेवा देणाऱ्या विमानतळाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर या विमानतळाच्या नावाचा समावेश होत आहे.
सध्या बंगळूरसाठी ४, हैद्राबादसाठी ३, मुंबईसाठी २, आणि पुण्यासाठी एक अशी विमाने उड्डाणे भारत असून, इंदोर, सुरत, कुडाप्पा, तिरुपती, म्हैसूर, चेन्नई, अहमदाबाद अशा ठिकाणी बेळगाव विमानतळावरून २७ विमानवाऱ्या होत आहेत.