केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रविवारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. तथापि शहा यांना बेळगावात कडाडून विरोध होत असून “अमित शहा गो बॅक” असा नारा देत शेतकऱ्यांनी आज सकाळी राणी चन्नम्मा चौकात अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर येत असून जनसेवक मेळावा असे नामकरण केलेली त्यांची जाहीर सभा बेळगावात होणार आहे. या सभेने त्यांचा बेळगावातील दौऱ्याचा समारोप होणार आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या भाजप धार्जिण्या सदस्यांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, नूतन मंत्री उमेश कत्ती, गोविंद कारजोळ, पी. राजीव यांच्यासह 20 हून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव दोऱ्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. राणी चन्नम्मा चौक येथे आज सकाळी शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत निदर्शने करून “अमित शहा गो बॅक” असे नारे लावले. तसेच चौकात ठिय्या आंदोलन केले. जिल्हा क्रीडांगणावर सायंकाळी 4 गृहमंत्री अमित शहा यांचा जनसेवक मेळावा अर्थात सभा होत असून यासाठी जिल्ह्यातील सुमारे 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहा यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या बॅनर, कट आउट्स आणि भाजपच्या झेंड्यांनी शहर व्यापून गेले आहे. सांबरा विमानतळ येथे जिल्हा क्रीडांगणापर्यंत सर्व रस्त्यावर स्वागत फलक लावण्यात आले आहेत.
त्याचबरोबर सदाशिवनगर, मध्यवर्ती बस स्थानक रस्ता, अशोक चौक, राणी चन्नम्मा चौक, डॉ आंबेडकर रोड, केएलई हॉस्पिटल रोड आदी मार्ग देखील स्वागत फलकांनी व्यापून गेले आहेत.