बेळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत म्हणून गणली जाणारी येळ्ळूर ग्रामपंचायत ही समितीचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आजतागायत महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व येळ्ळूर गावातील समितीनिष्ठ मराठी जनतेने अबाधित ठेवले आहे. राज्यभरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर विभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने केलेली खास बातचीत..
येळ्ळूर ग्रामपंचायत ही महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या एकूण ३० जागांपैकी ५ जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. यापैकी ४ जागांवर समितीचे वर्चस्व अबाधित राहिले असून उर्वरित २५ जागांसाठी ८० हुन अधिक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. परंतु आजतागायत येळ्ळूर ग्रामपंचायतीचा असलेला इतिहास हा यंदाच्या निवडणुकीतही पुनरावृत्तीची प्रचिती देईल, असा ठाम विश्वास येळ्ळूर विभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी यांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण सीमाभागातील मराठी जनतेच्या अस्मितेचा केंद्रबिंदू म्हणून येळ्ळूर गावाला पहिले जाते. अनेक राष्ट्रीय पक्षांच्या प्रलोभनांना भीक न घालता केवळ आपली मराठी अस्मिता जपण्यासाठी या गावातील मराठी जनता तळमळीने आणि निर्धाराने लढत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा आजतागायत येळ्ळूर ग्रामपंचायतीवर अभेद्य आहे. सध्या पंचायत निवडणुकीसाठी लढणारे सर्व जागांवरील उमेदवार हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढत असून हे सर्व उमेदवार महाराष्ट्र एकीकरण समितीशी बांधील आहेत. आणि याच अनुषंगाने आजपर्यंतच्या इतिहासाप्रमाणे आताही येळ्ळूर ग्रामपंचायतीवर भगवाच फडकविणार आणि परंपरेप्रमाणे पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नाचा ठराव मंजूर करण्याचा निर्धार दुधाप्पा बागेवाडी यांनी व्यक्त केला आहे.
‘येळ्ळूरमध्ये जे पेरलं जातं, तेच संपूर्ण सीमाभागात उगवतं!’
ग्रामपंचायतीपासून ते तालुका पंचायत आणि तालुका पंचायतीपासून जिल्हा पंचायतीपर्यंत, ज्या पद्धतीने येळ्ळूर गाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व आणि मराठी अस्मिता जपून आहे, त्याचपद्धतीने येळ्ळूरचे अनुकरण बेळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत होऊन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने सक्रिय होऊन पुन्हा एकदा महानगरपालिकेवर डौलाने भगवा फडकवावा.
महानगरपालिकेसाठी निवडणूक लढविणाऱ्या मराठी उमेदवारांनी येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अनुकरण करून समितीच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन महानगरपालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव मांडावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
याआधी आपण एकदा या पंचायतीवर सदस्य म्हणून निवडून आलो आहे. परंतु सध्या तरुण पिढीच्या हातात नेतृत्व देऊन गावच्या विकासाची धुरा तरुणांच्या खांद्यावर देण्यासाठी आपण ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या माझ्याकडे समितीचे एक पद आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळावी या हेतूने मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु आता निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार हे खात्रीणीशी निवडून येऊन समितीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवतील. कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असल्यामुळे प्रचारादरम्यान कोरोनासंदर्भातील सर्व नियम आणि अटी पाळण्यात येत असून गावकऱ्यांचा उस्त्फुर्त पाठिंबाही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर परिस्थिती पाहता येळ्ळूर गावातील मराठी जनतेची मराठी अस्मितेसाठी असलेली तळमळ, समितीशी असलेली बांधिलकी आणि सीमाप्रश्न सोडवणुकीचा ठाम निर्धार हे चित्र पाहता यंदाच्या निवडणुकीतही पंचायतीवर समितीचाच झेंडा फडकणार आणि इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की!