एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कोविड तांत्रिक समितीच्यावतीने वर्तविण्यात येत असतानाच दुसऱ्या बाजूला दहावी – बारावीचे वर्ग सुरु करण्याची चर्चा सुरु झाली आहे. जानेवारीपासून दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याची शिफारस कोविड तांत्रिक समितीने केली आहे.
यासंबंधी लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दहावी – बारावीनंतर नववी आणि अकरावीचे वर्ग सुरु करण्याची शिफारस या समितीने केली आहे. हा निर्णय येईपर्यंत यंदाच्या शैक्षणिक वर्षातही दहावी तसेच बारावीच्या परीक्षा पुन्हा दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सरकारसह शिक्षक, विद्यार्थी आणि पालकही संभ्रमात सापडले आहेत.
कोविड तांत्रिक समितीने केलेल्या शिफारसीत जानेवारी, फेब्रुवारीत कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून २६ डिसेंबर ते १ जानेवारी या दरम्यान रात्री ८ पासून पहाटे ५ पर्यंत संचारबंदी करण्याची शिफारसही या समितीने केली आहे. सण, उत्सव, धार्मिक, राजकीय कार्यक्रम तसेच इतर मेळाव्यावरील निर्बंध कायम ठेवण्यासहीत, यादरम्यान रुग्णवाहिका, आयसीयू तसेच व्हेंटिलेटर व्यवस्थाही सज्ज ठेवावी, अशी सूचना या समितीने केली आहे.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली कोविड तांत्रिक समितीच्या अहवालावर आधारित बैठक पार पडली होती. २३ नोव्हेंबर रोजी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत इतक्यात शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर पुन्हा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. कर्नाटक माध्यमिक शिक्षण व परीक्षा मंडळ तसेच पदवीपूर्व शिक्षण विभागाने बर्ड परीक्षेसाठी वेळापत्रक तयार करण्याची सूचना केली होती.
परंतु प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने काही काळ पुन्हा थांबण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. या परीक्षा तहकूब करण्यासाठी तांत्रिक समितीचे सदस्य व बंगळूर जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ व्हॅस्क्युलर सायन्सेसचे संचालक डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी सुचवले आहे. यासोबतच शैक्षणिक वर्षात शैक्षणिक दिवसांची कमतरता लक्षात घेऊन उन्हाळी सुट्टीही कमी करण्याचा सल्ला दिला आहे.