बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला असून हि व्यक्ती केरळमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यक्तीला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून शुक्रवार दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास एक व्यक्ती उडी मारून आत्महत्येच्या प्रयत्नात निदर्शनास आली.
याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांना हि माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
सदर व्यक्ती हि केरळ मधील असून वामनदेव असे या व्यक्तीचे नाव आहे. रायबाग शुगर्स कारखान्यात कामाला असणाऱ्या या व्यक्तीला कारखान्यातून पगार मिळाला नाही.
शिवाय कोणतेही कारण न देता कामावरून कमी करण्यात आले. या गोष्टीमुळे चिंताग्रस्त झालेल्या वामनदेव याने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धाव घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर चढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळाली आहे.