शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या एक दोन आठवड्यात प्रशासनाच्या संमतीने शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाचे सदस्य शिवानंद डंबळ यांनी बेळगांव लाईव्हला दिली.
आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि यांच्या उपद्रवामुळे अशा कुत्र्यांचे शहरातून उच्चाटन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे समजताच कर्नाटक पशु कल्याण मंडळाच्या सदस्यांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे धाव घेऊन शहानिशा केली. तेंव्हा तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाचे सदस्य शिवानंद डंबळ आणि डॉ. सोनाली सरनोबत यांनी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासमोर मांडला. चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीला अनुमती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी देखील शहरातील भटक्या कुत्र्यांचा उच्चाटनचा कोणताही विचार नसून आपण स्वतः पशू प्रेमी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीला संमती दर्शवून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन डंबळ आणि डॉ. सरनोबत यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडून परवानगी मिळाली असल्यामुळे आता येत्या एक-दोन आठवड्या नसबंदीची मोहीम हाती घेतली जाईल. तत्पूर्वी पशु संगोपन आणि कल्याण खात्याच्या उपसंचालकांशी चर्चा केली जाईल. त्याचप्रमाणे यासंदर्भात कांही बिगर सरकारी संघटनांशी (एनजीओ) आम्ही संपर्क साधणार आहोत. त्यांच्या मदतीने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची ही मोहीम राबविली जाणार असून यासाठी शहरातील प्रभागांची विभागणी केली जाईल, असे शिवानंद डंबळ यांनी अधिक माहिती देताना सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या.