राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने बांगलादेशातून भारतामध्ये बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या टोळीतील तिघा जणांना दोषी ठरवून त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी अधिकृतसूत्रांनी दिली. शिक्षा झालेल्यांमध्ये चिक्कोडी (जि. बेळगांव) येथील एका आरोपीचा समावेश आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने गेल्या सोमवारी कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नांवे दलिमा मिया -जलिम, अशोक महादेव कुंभार आणि शुक्रूद्दीन शेख – अन्सारी अशी असल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. गेल्या एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईत बनावट नोटा तस्करी प्रकरणाशी संबंधित अशोक कुंभार त्याने दलिमा मियाकडून घेतलेल्या 82 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.
सदर कारवाई बेळगांव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे करण्यात आली होती. त्यामुळे याप्रकरणी प्रथम चिक्कोडी पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंद झाला होता. तपासादरम्यान राजेंद्र पाटील -देसाई, गंगाधर उर्फ गंगाप्पा कोलकार, शहानायज कसुरी उर्फ इशाक शेख आणि शुक्रूद्दीन शेख – अन्सारी असे एकूण 6 जण बनावट नोटांच्या तस्करीत गुंतले असे आढळून आल्याने या सर्वांना अटक करण्यात आली होती. कुंभार याच्यासह अटक केलेल्या सहा आरोपींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल केला होता.
भारत -बांगलादेश सीमेवर शेख आणि त्याचा अन्य एक सहकारी शरीफ उल इस्लाम या दोघांना बांगलादेशच्या सद्दाम शेख आणि हकीम शेख यांच्याकडून बनावट नोटा मिळाल्या होत्या, असे प्रवक्त्याने सांगितले. न्यायालयाने मिया, कुंभार आणि शेख यांना भादविच्या कलमांखाली अनुक्रमे 6, 5 व 2 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
त्याच प्रमाणे प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उर्वरित तीन आरोपींवरील खटला अद्याप सुरू आहे. दरम्यान सद्दाम आणि हकीम या बांगलादेशी तस्करांचा तपास सुरू आहे.