साईराज हुबळी टायगर्स आणि सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी चषक भव्य साखळी (लिग) क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी उद्या बुधवार दि. 30 डिसेंबर 2020 रोजी अंतिम लढत होणार आहे.
कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर आज सकाळी झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात साईराज हुबळी टायगर्स संघाने प्रतिस्पर्धी एक्सेस इलाईट हुबळी संघावर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला. सकाळी नाणेफेक जिंकून साईराज हुबळी टायगर्स संघाने एक्सेस इलाईट हुबळी संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले.
प्रथम फलंदाजी करताना एक्सेस इलाईट संघाने 22 षटकात 8 गडी बाद 115 धावा काढल्या. त्यांचे हे आव्हान यशस्वीरित्या पेलताना साईराज हुबळी टायगर्स संघाने 17.1 षटकात 3 गडी बाद 116 धावा काढून अंतिम फेरी गाठली. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी साईराज संघाचा अर्जुन नुगानट्टी हा ठरला. त्याने फलंदाजीत 8 चौकारांच्या सहाय्याने अर्धशतकासह 54 धावा झळकाविल्या. प्रमुख पाहुणे रजनी प्रकाश पाटील, राष्ट्रीय क्रीडापटू नंदा कल्लूर, नागेश एम. व सचिन रजपुत यांच्या हस्ते अर्जुनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेचा आज दुपारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात हर्ष पटेल याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी अलोन स्पोर्ट्स बेळगाव संघावर 67 धावांनी एकतर्फी विजय मिळविला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाने मर्यादित 25 षटकात 8 गडी बाद 126 धावा काढल्या. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या अलोन स्पोर्ट्स बेळगाव संघाचा डाव प्रारंभापासूनच जो कोसळा तो 18.6 षटकात सर्व गडी बाद 59 धावा संपुष्टात आला. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी सुपर एक्सप्रेस संघाचा हर्ष पटेल हा ठरला.
हर्षने 5 षटकात अवघ्या 6 धावा देऊन तब्बल 5 गडी बाद केले. त्याला प्रमुख पाहुणे प्रशांत लायंदर, यतेंद्र देशपांडे व परशराम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त संघमालक विठ्ठल गवस यांनी हर्षला 1 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले.
आता उद्या बुधवार दि 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता युनियन जिमखाना मैदानावर साईराज हुबळी टायगर्स आणि सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.