सौजन्य: https://www.facebook.com/heritageofbelgaum
रंगुबाई भोसले यांचा जन्म 1895 साली बाळेकुंद्री गावातील रामचंद्रराव आणि बाळाबाई भोसले या शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले आणि या घटनेमुळे नशिबाने बाळाबाई आणि रंगु यांना बेळगांवला आणले. बेळगांवात आल्यानंतर राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी श्री बसवाण्णा मंदिराच्या पायऱ्यांचा महिनाभर आसरा घेतला. अगदी लहान वयात शाळेत दाखल करण्यात आलेल्या रंगुबाई यांना ज्ञान संपादनाची आवड होती. त्यावेळी उदरनिर्वाहासाठी बाळाबाई यांनी आठवड्याच्या शनिवारच्या बाजारात लोणी विकण्यास सुरुवात केली.
अल्पावधीत त्यांचा हा व्यवसाय बहरू लागला आणि बाळाबाई लोणी विक्रीसाठी वारंवार पुण्याच्या प्रवासाला जाऊ लागल्या. पुणे येथील चिमण शेठजी यांना लोणी देण्यासाठी जाणाऱ्या बाळाबाई यांना कांहीवेळा रंगुबाई यांची सोबत लाभत होती. पुणे येथील एका भेटीदरम्यान रंगुबाई यांचा चिमण शेठजींच्या मोती आणि हिऱ्यांच्या अस्सलपणाचे मूल्यमापन करण्याच्या अन्य एका व्यवसायाशी परिचय झाला. तेंव्हा शेटजींनी रंगुबाई यांना हिरे आणि मोत्यांची पारख करण्याची कला शिकविली, शिवाय पुण्यामध्ये त्यांचे स्वतःचे दुकान सुरू करण्यास मदत केली. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या या व्यवसायात रंगुबाई यांनी अल्पावधीत आपले असे वेगळे स्थान निर्माण केले.
1923 मध्ये नागपूरचे लक्ष्मणराव भोसले पुण्याला आले असता रंगुबाई यांची हिरे आणि मोत्यांची पारख करण्याची कला पाहून ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी रंगुबाईंना नागपूर येथील आपल्या वाड्यामध्ये स्थाईक होण्याचे निमंत्रण दिले. तेथील वास्तव्यादरम्यान लक्ष्मणरावांच्या आई आजारी पडल्यामुळे रंगुबाई यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तसेच त्यानंतर त्यांनी स्वतःचे आयुर्वेदिक औषध तयार करण्याचे केंद्रही सुरू केले. पुढे काही वैयक्तिक कारणास्तव रंगुबाई यांना बेळगावला माघारी परतावे लागले.
बेळगांवात 1924 साली त्यांनी स्वतःच्या मालकीचा महाराष्ट्र औषध कारखाना सुरू केला. व्यवसाय वृद्धिंगत झाल्यानंतर रंगुबाई यांनी मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. त्यावेळी 1927 साली अभियंते रावसाहेब अरस यांच्या मदतीने त्यांनी सध्याच्या रंगुबाई पॅलेसचा पाया घातला. निओ -गॉथिक (12 व्या शतकानंतरची युरोपियन शिल्पकला) आणि निओ -क्लासिक घटकांचा मिलाफ असलेली वैशिष्टपूर्ण सारग्राही पद्धत रंगुबाई पॅलेस इमारतीमध्ये दिसून येते. ओतीव लोखंडापासून सानुकूल पद्धतीने बनविलेल्या इमारतीच्या रेलिंगवर पॅलेसचे नांव आणि रंगुबाई यांचे व्यक्तीचित्र बसविण्यात आले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी लाव्हा निर्मित ब्लॅक बेसाल्ट दगड आणि फिकट तपकिरी दगडांचा वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या प्रशस्त आवार भिंतीच्या प्रवेशद्वारावर संगमरवरी सिंहाची जोडी बसविण्यात आली होती. कांही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणाप्रसंगी ही आवार भिंत काढण्यात आली. इमारतीचा गॅलर्या असणारा दुसरा मजला दिवाणखाना म्हणून ठेवण्यात आला होता. याठिकाणी महिलांची आसन व्यवस्था आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह करण्यात आले होते. रंगुबाई यांची अल्पकाळासाठी स्वतःच्या मालकीची चित्ताकर्षक नाटक कंपनी हि थिएटर कंपनी देखल होती.
लक्ष्मणराव भोसले यांनी 8 जून 1929 रोजी रंगुबाई पॅलेसचे उद्घाटन केले. तथापि पॅलेसचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यासाठी 1932 साल उजाडावे लागले. 1937 साली रंगुबाई यांनी म्युनिसिपालिटी निवडणूक लढविली. या निवडणुकीच्या कालावधीमध्ये या पॅलेसमध्ये लोकमित्र ही प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आली. सदर निवडणूक रंगुबाई हरल्या असल्यातरी त्यानंतर बेळगांव म्युनिसिपालिटीमध्ये निवडून येणाऱ्या बेळगांवातील पहिल्या महिला नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळवला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मराठा लाईट इन्फंट्रीने या पॅलेसचा वापर भरती केंद्र म्हणून केला. 12 ऑक्टोबर 1962 साली रंगुबाई यांचे मिरज येथे हे निधन झाले आणि अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव बेळगांवला आणण्यात आले. नागरिकांचे सक्षमीकरण आणि गरिबी हटविण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे यावर रंगुबाई भोसले यांचा दृढ विश्वास होता. 1937 साली रंगुबाई साहेब भोसले ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आपले वचन पाळताना रंगुबाई यांनी आपली आयुष्यभराची कमाई बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केली. 1966 सालापासून रंगुबाई पॅलेसमध्ये रंगुबाई भोसले मुलींची शाळा सुरू करण्यात आली.
स्त्रोत – टी. बी. पिंगट यांचे ‘त्यागामूर्ती रंगूबाई भोसले’