विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरातील खाजगी शाळा बंद करण्याचा निर्णय खाजगी शाळा संचालकांकडून घेण्यात आला आहे. ऑनलाईन क्लास बंद करून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज्यभरात खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उद्यापासून तारांबळ उडणार आहे.
सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सुरु असलेले ऑनलाईन वर्ग ताबडतोब बंद करावेत, या प्रमुख मागणीसह खाजगी शाळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘रुप्स’ अंतर्गत शाळा बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
सोमवारपासून शाळांसह ऑनलाईन क्लासही बंद करण्यात येणार आहेत. राज्यभरात १२८०० खाजगी शाळा ‘रुप्स’ मध्ये नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. शाळांची नोंदणी, नूतनीकरण आणि इतर नियमांसह विविध १५ मागण्या सरकारकडे खाजगी शाळांच्यामार्फत करण्यात आल्या आहेत.
आधीच लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातच ऑनलाईन क्लासच्या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडाली आहे. सध्या शैक्षणिक वर्ष शेवटच्या टप्प्यात असून खाजगी शाळांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
जोवर सरकार खाजगी शाळांच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण करत नाही, तोवर खाजगी शाळांचे व्यवस्थापन तसेच ऑनलाईन वर्ग बंद असणार आहेत.