पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हते. आता त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो.
बेळगावमधील गणाचारी गल्ली येथे वास्तव्यास असणारे सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांनीही अवयवदानाचा संकल्प केला आहे. नॅशनल ऑरगन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) या संस्थेकडे त्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी आपले ८ अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे.
अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत. समाजामध्येही नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया, नवे उपचार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैद्यकीय क्षेत्राने केली आहे. आजार कितीही गंभीर असो, नवे संशोधन, नव्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे तो बरा होण्याची शक्यता वाढली आहे, हे वैद्यकीय शास्त्राचे हे मोठे यश म्हणावे लागेल.
अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते किंवा ज्या व्यक्तींचा मेंदू मृत होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरीरातील किडनी, यकृत, डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात.
त्यामुळे कुणाला किडनी मिळते तर कुणाला डोळे, किडनी, लिव्हरमुळे जीवदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात. हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल. ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या नव्या संकल्पनेनुसार कुटुंबातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केला पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांनी व्यक्त केले आहे.