Thursday, May 2, 2024

/

परिवहन आंदोलनावर काय म्हणाले लक्ष्मण सवदी?

 belgaum

 

परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी बंगळूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आंदोलनकर्त्यांना मुक्त संवादासाठी परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी आमंत्रित केले.

काल आणि आज सुरु असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बससेवा ठप्प झाली आहे. या दरम्यान काही ठिकाणी बसवर दगडफेकीचे प्रकारही झाले आहेत. संप आणि बसवर झालेल्या दगडफेकीमुळे परिवहनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिवहन खात्याच्या कर्नाटक परिवहन, बंगळूर परिवहन, वायव्य कर्नाटक परिवहन, ईशान्य कर्नाटक परिवहन या संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या सुमारे १.३० लाख कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणासाठी सरकार पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे. परिवहनच्या कर्मचाऱ्यांप्रती मला आणि सरकारला सहानुभूती आहे. कोविड मुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन कालावधीतही कोणत्याही कपातीविना प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार देण्यात आला आहे.

 belgaum

तसेच कोविड काळात सेवा बजाविताना ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशा सर्वांना येत्या पंधरवड्यात ३० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मी आश्वासन देत आहे. याशिवाय परिवहन कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, यासंदर्भात चर्चा करून सामोपचाराने हि समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे आश्वासन परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

या आंदोलनामुळे जनतेची गैरसोय होत असून कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याची विनंती सवदी यांनी केली. जनतेची गायीसोयी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत रुजू व्हावे, यासाठी मी त्यांना हात जोडून विनंती करत आहे, तुमच्या समस्या चर्चा करून सोडवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या याची मला जाणीव आहे. याआधीही परिवहन कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यां सरकारने सोडविल्या आहेत. परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी खुद्द मुख्यमंत्रीही मदतीसाठी तयार आहेत. यापुढील काळात कोणत्याही समस्येसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी मुक्तपणे आपल्याशी संवाद साधावा, परंतु सध्या पुकारण्यात आलेला संप मागे घेऊन, जनतेची गैरसोय टाळावी आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या पत्रकार परिषदेत केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.