ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ३१ डिसेंबर रोजी सकाळी ६ पर्यंत निषेधाज्ञा जारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंबंधीचे आदेशपत्र जारी केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील संपूर्ण १४ तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आणि निकाल ३० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजल्यापासून शहरातील बी. के. मॉडेल हायस्कुलमध्ये सुरुवात होणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी बुधवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ६ ते गुरुवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ६ पर्यंत १४४ कलाम लागू करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी समूहाने एकत्रित जमणे, मिरवणूक, विजयोत्सव, राजकीय सभा-समारंभ आयोजित करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे.