सोमवार दि. २९ रोजी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर घातलेल्या गोंधळाचे मूळ कारण हे कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मधील लाल-पिवळ्या ध्वजस्तंभाचे होते. या चौकातील लाल-पिवळा अज्ञातांनी हटविला असे समजून घातलेल्या गोंधळावर पडदा पडला असून हा ध्वज कोणीही हेतुपुरस्सर काढला नसून या चौकातून मार्गस्थ होणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रकच्या धडकेमुळे उतरला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेज निदर्शनास आल्यामुळे कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना चपराक मिळाली आहे.
हा लाल – पिवळा अज्ञातांनीं उतरवला असून तिरकसपणे या अपघाताकडे मराठी भाषिकांना लक्ष्य बनविण्याचे कारस्थान कन्नड संघटनांचे होते. या प्रकारात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या भागाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले असता, हा ध्व्ज अपघाताने उतरला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोमवारी सकाळी कर्नाटक रक्षण वेदिका आणि काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिका इमारतीसमोर गोंधळ माजविला. हि प्रशासकीय इमारत असूनही पोलिसांनी या सर्व प्रकाराला डोळेझाक करत खतपाणी घातले. केवळ बघ्याची भूमिका घेत उलट कन्नड कार्यकर्त्यांची अरेरावीची भाषाही झेलली. दरम्यान कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीताचाही अवमान केला. परंतु कर्नाटकातील कन्नड संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कर्नाटकी प्रशासन कोणतेही शासन करत नाही. कर्नाटकातील कन्नड संस्था, संघटनांना कोणताही कायदा लागू होत नाही. त्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र कायदा असतो.
परंतु याउलट मराठी भाषिकांना मात्र सर्व कायदे बारकाईने कर्नाटकी प्रशासन शिकवत असते. सोमवारी झालेल्या प्रकारानंतर कन्नड संस्थांनी मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचे ठरविले होते. परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये चन्नम्मा चौकातील सारा प्रकार उघडकीस आल्यामुळे सर्वच कन्नड संघटनांची बोलती बंद झाली आहे.
सदर ध्वज हा कुणीही हेतुपुरस्सर काढलेला नसून केवळ अपघाताने हा ध्वज उतरला असल्याचे दिसून आले आहे. स्थानिक सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार दिसून आला आहे. याची माहिती उजेडात आली असून मनपासमोर लाल-पिवळा ध्वज लावण्याचे कृत्य वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केले. या घटनेनंतर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. मात्र शेवटी याचा काहीच उपयोग झाला नसून, नेहमीप्रमाणे कन्नड संघटनांची मर्कटलीला जनतेसमोर उघड झाली आहे.