पर्यावरण संरक्षणासाठी झाडांच्या बुंद्ध्यांचा वापर जाहिरातीसाठी करण्याची चुकीची प्रवृत्ती आणि घरातील देवादिकांचे अनावश्यक फोटो झाडाखाली ठेवण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने कॅन्टोन्मेंट मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी आजपासून मोहीम उघडली आहे. या आदर्शवत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अलीकडेच आपल्या मुलीसोबत सकाळी फिरावयास गेलेल्या प्रशांत बिर्जे यांना टिळकवाडीतील व्हॅक्सीन डेपो परिसरातील झाडांखाली घरातील देव देवतांचे फोटो ठेवलेले आढळून आले. घरात श्रद्धेने पूजले जाणारे हे फोटो अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी पडलेले पाहून बिर्जे यांनी खेद वाटला. यावर उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने घरातील देवादिकांचे फोटो गोळा करून त्यांचा सदुपयोग करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने होनगा येथील मार्कंडेय नदीवरील पुलाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या देव-देवतांच्या तसबिरी आज स्वतः मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष आर. दरेकर आणि राहुल चौहान यांनी एकत्रित जमा केले.
आज शुक्रवारी सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत सत्कार्य करण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान देवादिकांचे फोटो एकत्रित करण्याबरोबरच एका झाडाला यातनांपासून मुक्त करण्यात आले.
पर्यावरण संरक्षण हे देखील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने प्रशांत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली झाडांच्या बुद्ध्यांवरील जाहिराती हटविण्याची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे. आज शुक्रवारी फक्त एका झाडावर जाहिरातीसाठी ठोकण्यात आलेल्या 200 स्टेपल पिना आणि 30 हून अधिक लोखंडी खिळे उखडून काढून संबंधित झाडाला दिलासा देण्यात आला. सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.