कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या 18 डिसेंबर 2020 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार येत्या 2021 साली न्यायालयीन कामकाजाचे दिवस वाढविण्यात आले असून पुढील वर्षातील 11 शनिवार न्यायालयं सुरू राहतील. तथापि उन्हाळ्याच्या सुट्ट्या मात्र अबाधित असतील.
कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 सालामध्ये न्यायालय बंद ठेवण्यात आल्यामुळे जे दिवस वाया गेले ते भरून काढण्यासाठी 2021 सालामध्ये कामाचे दिवस वाढविण्यात आले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बेंगलोर येथील प्रमुख खंडपीठासह धारवाड आणि कलबुर्गी येथील खंडपीठांनी आगामी 2021 सालातील न्यायालयांचे सुट्टीचे दिवस असणारे पुढील 11 शनिवार कामाच्या दिवसात परिवर्तित केलेले आहेत.
दि. 16 जानेवारी 2021, दि. 6 फेब्रुवारी 2021, दि. 6 मार्च 2021, दि. 17 एप्रिल 2021, दि. 29 मे 2021, दि. 19 जून 2021, दि. 24 जुलै 2021, दि. 7 ऑगस्ट 2021, दि. 4 सप्टेंबर 2021, दि. 23 ऑक्टोबर 2021 आणि दि. 18 डिसेंबर 2021. कर्नाटक उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल मुख्य न्यायाधीश राजेंद्र बदामीकर यांनी एका आदेशाद्वारे हा बदल जाहीर केला आहे.