राज्यातील धारवाड, विजापूर आणि इतर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी सहा महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश बंगळूर उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
धारवाड येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात के. गुरुनाथ यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने निकाल देत येत्या तीन महिन्याच्या कालावधीत प्रभागवार आरक्षण आणि वॉर्डनिहाय रचनेसंदर्भातील नोटिफिकेशन प्रकाशित करावेत अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.
नोटिफिकेशन जरी केल्यानंतर त्यानंतरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पार पाडून सभागृह अंमलात आणण्याचेही निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा आधीच सुरु झाली असून प्रतीक्षेत असणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल आगामी सहा महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाजण्याची दाट शक्यता आहे.
हायकोर्टाच्या निर्णयानुसार मार्च अखेरीस महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग अधिसूचना जाहीर करेल. आणि त्यानंतर ३ महिन्याच्या आत महानगरपालिका निवडणुका होणार आहेत.