बेळगांव रेल्वे स्थानकावर हे का होमगार्ड व पोलिसाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चालत्या रेल्वेतून उतरून पुन्हा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चिमुकलीचा जीव वाचल्याची थरारक घटना गेल्या 1 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. रेल्वे स्टेशनवरील सीसी टीव्हीमध्ये कैद झालेल्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
हजरत निजामुद्दीन येथून वास्कोला जाणारी गोवा एक्सप्रेस गेल्या 1 डिसेंबर 2020 रोजी रात्री 01:55 च्या सुमारास बेळगांव रेल्वे स्थानकावर दाखल होऊन अल्पावधीत वास्कोकडे मार्गस्थ झाली. त्यावेळी धीम्या गतीच्या या मार्गस्थ रेल्वेतून एका लहान मुलीने गाडी थांबणार असे समजून प्लॅटफॉर्मवर उडी मारली.
मात्र रेल्वे पुढे जात असल्याचे पाहून त्या मुलीने पुन्हा लगबगीने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. परिणामी ती अडखळून रेल्वे डब्याच्या पायरीवर पडून फरफटली जाऊ लागली. हा प्रकार रात्रपाळीसाठी असलेल्या एका होमगार्डच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून तात्काळ त्या मुलीच्या दिशेने धाव घेतली आणि तिला चालत्या गाडीपासून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो देखील मुलीसह प्लॅटफॉर्मवर कोसळला. त्यावेळी तेथे सेवा बजावणाऱ्या एका पोलिसाने या दोघांनाही रेल्वेपासून दूर ओढून सुरक्षित केले.
रेल्वेखाली सापडून शकणाऱ्या संबंधित मुलीला जीवदान देणाऱ्या होमगार्डचे नांव एच. बी. नेसरगी असे आहे, तर नेसरगी व त्या मुलीला वाचविणाऱ्या पोलिसाचे नांव सिद्धय्या हिरेमठ असे आहे. नेसरगी व हिरेमठ यांनी प्रसंगावधान राखून दाखविलेल्या धाडसाचे रेल्वे स्थानकावर सर्वत्र कौतुक होत होते.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1281998012157789/