कोरोनाचे सावट असताना देखील यंदा नाताळ अर्थात ख्रिसमस सणानिमित्त गुरुवारी रात्री 12 वाजता बेळगांव शहरासह उपनगरे आणि आसपासच्या गावातील ठिकठिकाणच्या चर्चमध्ये कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून ख्रिसमस अर्थात येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील कॅम्प येथील फतिमा कॅथेड्रल चर्च, फिश मार्केटचे सेंट अँथनी चर्च, इम्मॅक्युलेट कन्सेप्शन चर्च (आयसी चर्च), डिव्हाईन मर्सी चर्च, बेथल प्रेयर हाऊस (हेब्रोन चर्च), बेलगाम चर्च (न्यू इंडिया चर्च ऑफ गाॅड), सेंट्रल मेथोडीस्ट चर्च, माउंट कार्मेल चर्च, सेंट सेबॅस्टियन चर्च संतीबस्तवाड आदी चर्चमध्ये येशू जन्म सोहळ्यानिमित्त गुरुवारी रात्री सामूहिक विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
जन्म सोहळ्याची सुरुवात कॅरल सिंगिंगने झाली आणि त्यानंतर ख्रिसमस ईव्ही संपन्न झाला. याप्रसंगी धर्मगुरूंनी उपस्थितांना दया-क्षमा-शांती व एकतेचा संदेश दिला. मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर पाळून हे सर्व कार्यक्रम पार पडले.
ख्रिसमस ईव्हीनंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ख्रिसमस निमित्त सर्वच चर्चना आकर्षक विद्युतरोषणाई केल्यामुळे त्यांच्या आसपासचा परिसर उजळून गेला होता. शहर आणि परिसरातील प्रत्येक चर्चच्या आवारात तसेच विविध ठिकाणी गुरुवारी रात्री ख्रिसमस ट्री वगैरे लावून येशूच्या जन्माचे सुंदर देखावे सादर करण्यात आले होते. येशु जन्माच्या या देखाव्यांना केलेली रंगीबिरंगी विद्युतरोषणाई तसेच ‘मेरी ख्रिसमस’ व ‘हॅप्पी न्यू इयर’चा शुभेच्छा फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
येशु जन्म सोहळ्यापूर्वी ख्रिसमसनिमित्त चर्चतर्फे तसेच ख्रिस्ती बांधवांतर्फे कॅरल सिंगिंग झालेले. सांताक्लोजच्या वेशात आलेल्या मंडळींनी कॅरल गीते म्हणत बालचमूचे लक्ष वेधून घेतले व त्यांना खाऊ-भेट वस्तू दिल्या. याखेरीज सर्व चर्चमध्ये कन्फेशनचा विधी झाला. वर्षभरात आपल्या हातून कोणत्याही चुका अथवा पाप झालेले असेल तर त्याची कबुली कन्फेशनद्वारे दिली जाते. सर्वांनाच ख्रिसमस आनंदाने साजरा करता यावा या हेतूने ख्रिस्ती समाजात ‘आऊट रिच’ हा विधी असतो म्हणजे समाजातील श्रीमंत वर्ग आणि चर्चतर्फे गरिबांना ख्रिसमस साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे सहाय्य केले जाते, तसेच कांही चर्चतर्फे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
दरम्यान, ख्रिसमस हा सण सद्भावना आणि एकमेकांविषयी बंधूभाव वृद्धिंगत करणारा आहे. तेंव्हा त्यामधून सर्वांच्या जीवनातील आनंद आणि प्रेमभाव वृद्धींगत व्हावा, अशा शुभेच्छा बेळगाव डायोसिसचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी सर्व धर्मीयांना दिल्या आहेत.