खरेदी केल्याचे सांगून जबरदस्तीने बंद करण्यात आलेला आपला रीतसर नोंद असलेला रहदारीचा रस्ता तात्काळ खुला करून देण्यात यावा, अशी मागणी नाथ पै नगर अनगोळ येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नाथ पै नगर अनगोळ येथील रहिवाशांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. महापालिका व्याप्तीत येणाऱ्या नाथ पै नगर अनगोळ येथील रि.स.नं. 655 येथील रहदारीच्या रस्त्यावर पुरुषोत्तम केशव चौगुले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण करून कब्जा मिळविला आहे.
आपण हा रस्ता खरेदी केल्याचे ते सांगत आहे. चौगुले कुटुंबियांकडून हा रस्ता अडविण्यात आल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांचा वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जाब विचारल्यास अरेरावीची उत्तरे देऊन नागरिकांना धमकावले जात आहे. चौगुले यांनी रस्त्यावर गेट बांधून ते बंद केले असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्ता रहदारीसाठी तात्काळ खुला करण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
चौगुले नामक इसमाने जागा खरेदी केली असल्याचे सांगून हा रस्ता अडवल्यामुळे गेल्या 40 वर्षांपासून आम्हाला त्रास होत आहे. या रस्त्यावर चौगुले यांच्यासह आम्ही एकूण सात जण राहतो. या सात जणांपैकी सहा जणांच्या खरेदी पत्रात रस्त्याची नोंद आहे.
रस्त्याची रितसर रजिस्टर नोंद असतानादेखील चौगुले या रस्त्यावर आपला मालकी हक्क सांगत आहेत. रस्ता अडविण्यात आल्यामुळे इतके दिवस आम्ही शेजारील आवाराच्या भिंतीवरून ये-जा करत होतो परंतु आता त्या आवाराच्या भिंतीवर कांचा लावण्यात आल्या आहेत, त्यामुळे आमचे वहिवाटीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.
याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित रस्ता रहदारीसाठी खुला करून द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे तक्रारदार प्रकाश होसुरकर यांनी सांगितले. निवेदन सादर करतेवळी होसुरकर यांच्यासह रावसाहेब माने, बसवंत ताशिलदार, उमेश पोटे, ज्योतिबा पोटे, यल्लाप्पा पोटे, श्रीकांत ताशिलदार आदींसह महिलावर्ग उपस्थित होता.