शहरातील गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) कॉलेजच्या अब्दुलजब्बार खान या विद्यार्थ्याने राष्ट्रीय जैव उद्योजकता स्पर्धेतील 2 लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले आहे.
हिरड्यांशी संबंधित दातांच्या समस्या दूर करणारे इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाईस अर्थात उपकरण विकसित केल्याबद्दल त्याला हे पारितोषिक देण्यात आले आहे.
राष्ट्रीय जैव उद्योजकता स्पर्धा (एनबीईसी) -2020 साठी अंतिम फेरीत एकूण 14 प्रवेशिका आल्या होत्या. यामध्ये 11 जैवउद्योजक आणि विद्यार्थ्यांच्या 3 चमुंचा समावेश होता. एनबीईसी -2020 ही स्पर्धा भारतातील प्रतिभावंत विद्यार्थी उद्योजक व्यक्ती उद्योजक आणि प्रस्थापित कंपन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अब्दुलजब्बार खान याने के अँड एस पार्टनर्स, बायोनीड्स इंडिया आणि आयडियास्प्रिंग पुरस्कृत 2 लाख रुपयांचे बक्षीस मिळविले.
सदर स्पर्धा टप्प्याटप्प्याने घेण्यात आली. स्पर्धेच्या प्रारंभी 19 विद्यार्थी चमुंसह एकूण 54 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामधून 10 विद्यार्थी चमूसह 28 स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात आली आणि यातून अंतिम फेरीचे स्पर्धक निवडण्यात आले. अंतिम फेरीसाठी देशातील जैवतंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.