आगामी जागतिक अपंगत्व दिन आचरणात आणण्यास संदर्भातील पूर्वतयारीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे होते. दरवर्षी 3 डिसेंबर 2020 रोजी जागतिक अपंगत्व दिन आचरणात आणला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे अद्याप शाळा सुरू झालेला नाहीत. त्यामुळे यावेळी येत्या 3 डिसेंबर 2020 रोजी कोणत्याही क्रीडा स्पर्धा अथवा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता साध्या पद्धतीने हा जागतिक अपंगत्व दिन आचरणात आणण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
यासाठी एखाद्या व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करा. अंध, अपंग व मतिमंद मुलांच्या उत्कर्षासाठी काय करता येईल का? त्यांच्या काही समस्या आहेत का? त्या समस्या कशा दूर करता येईल? या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांच्या शिक्षकांना एकत्रित करून चर्चासत्र घडवून आणा, अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केली.
याप्रसंगी जिल्हा अपंग कल्याण अधिकारी नामदेव बैलकर, जिल्हा शिक्षणाधिकारी नाईक, मनपा आरोग्य अधिकारी एस. बी. घंटी, बेळगाव जिल्हा अंधांसाठीच्या संघटनेचे अध्यक्ष विकास कलघटगी, माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे, सरकारी मूकबधिर मुलांच्या शाळेचे सहाय्यक संचालक बी. आर. बनशंकरी, आराधना मतिमंद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार आदींसह बेळगांव शहर आणि गोकाक, हिडकल, बैलहोंगल आदी ठिकाणच्या जिल्ह्यातील संबंधित शाळांचे शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.