दोन वर्षे उलटली तरी अर्धवट अवस्थेत पडून असलेले एपीएमसी मार्केट ते कंग्राळी खुर्द गावापर्यंतच्या रस्त्याचे विकास काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी कंग्राळी खुर्द अशा संतप्त ग्रामस्थांनी आज जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले. अखेर स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांकडून दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले एपीएमसी मार्केट यार्ड ते कंग्राळी खुर्द गावापर्यंतच्या रस्त्याचे विकासकाम दोन वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी अर्धवट विकास काम झालेल्या अवस्थेतील हा रस्ता धोकादायक ठरत आहे. कारण अलीकडे काही महिन्यांपासून या रस्त्यावरील एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे परिणामी या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना विशेषतः दुचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागते.
या रस्त्याचा चांगल्या प्रकारे लवकरात लवकर विकास केला जावा यासाठी अनेकदा अर्ज विनंत्या व आंदोलने करून देखील दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे आज सकाळी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंग्राळी खुर्द आणि परिसरातील नागरिकांनी एपीएमसी मार्केट यार्ड समोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडून प्रशासन आणि पर्यायाने सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी जवळपास दोन तास सुरू असलेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्तारोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अखेर एपीएमसी पोलीस स्थानकाचे सीपीआय जावेद महापुरे यांनी संतप्त कंग्राळी खुर्द ग्रामस्थ आणि स्मार्ट सिटी अभियंता यांच्यात मध्यस्थी केली त्यांनी ग्रामस्थांची बाजू स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांना समजावून दिली. तेंव्हा हा दोन महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन अभियंत्यांनी दिले. यावेळी जि प सदस्य सरस्वती पाटील यांनी उपस्थित संबंधित अभियंते आणि कंत्राटदाराला धारेवर धरले. तसेच आम्हाला तोंडी आश्वासनाला हरकत घेऊन लेखी आश्वासनाची मागणी केली. स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांनी तसे लेखी आश्वासन देताच रास्ता रोको मागे घेण्यात आला.
याप्रसंगी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, आर. आय. पाटील, चेतक कांबळे, बाबू सांबरेकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, लक्ष्मण होनगेकर, यल्लाप्पा पाटील, मनोहर पाटील अनिल सूर्यवंशी, जी. जी. कंग्राळकर, पी. डी. पाटील, चंद्रकांत धुडूम आदींसह कंग्राळी खुर्द ज्योती नगर व मार्कंडेयनगर येथील रहिवाशांसह एपीएमसी येथील व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रास्तारोको आंदोलनासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या की, एपीएमसी मार्केट यार्ड ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या या रस्त्याच्या कामासाठी आपण गेल्या पाच वर्षापासून सरकार दरबारी प्रयत्न करीत आहोत. दोन वर्षापूर्वी या रस्त्याच्या विकास कामासाठी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी दडपशाही करून आमचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा माझ्या हाताला गंभीर दुखापत देखील झाली होती. स्वतःला कितीही त्रास होऊ दे पण जनतेला त्रास होता कामा नये, हे माझे आधीपासूनचे तत्त्व आहे. त्यामुळे आजतागायत जनतेच्या हितासाठी हा रस्ता चांगल्या प्रकारे तयार व्हावा यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून या रस्त्याचे काम केले जात आहे. याच्याशी कोणत्याही आमदार निधीचा संबंध नाही.
गेल्या दोन वर्षात स्मार्ट सिटी अंतर्गत इतर रस्त्यांची कामे पूर्ण झालेली असताना या रस्त्याकडे का दुर्लक्ष होत आहे? हा आमचा सवाल आहे. उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे मार्केट यार्ड म्हणून ओळखले जाणारे बेळगांवचे एपीएमसी मार्केट यार्ड या रस्त्यालगत आहे. असा हा रस्ता शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे. तेंव्हा आता तरी दिलेल्या दोन महिन्याच्या निर्धारित कालावधीत या रस्त्याचे काम पूर्ण केले जावे, अन्यथा आम्हाला अधिक उग्र भूमिका घ्यावी लागेल, असेही जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.