शहरातील भडकल गल्ली आणि वडगाव परिसरातील दोन आयुर्वेदीक दवाखान्यांना टाळे ठोकण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने ही कारवाई केली असून भडकल गल्ली येथील शिवशक्ती आयुर्वेदीक सेवा भवन आणि बाजार गल्ली, वडगाव येथील हळ्ळीमने वनस्पती भांडार या दवाखान्यांना टाळे ठोकण्यात आले आहेत.
या दोन्ही दवाखान्यात रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात येत होते. परंतु या दोन्ही दवाखान्यातील डॉक्टर तीन – तीन ठिकाणी सेवा बजावित होते. यामुळे याविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.
कर्नाटक खाजगी वैद्यकीय आस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार हि कारवाई केली आहे. या कारवाईवेळी स्वतः डॉ. डुमगोळ उपस्थित होते. याशिवाय जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दोडवाड, विभागीय आयुष अधिकारी डॉ. सुंधोळी उपस्थित होते. भडकलं गल्ली व बाजार गल्ली वडगावमधील दोन्ही दवाखान्यांबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली होती. त्यांनी या तक्रारींबाबत चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता.
त्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही दवाखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना दिले. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यानी डॉ. डुमगोळ तसेच आयुष विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्यानुसार हि कारवाई झाली आहे. हि कारवाई बेळगावातील वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे.