टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे सिमेंट काँक्रीटचे ब्रॅकेट्स घालण्याचे काम सध्या सुरू असले तरी आज त्यामुळे या मार्गावर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार घडला.
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या या ब्रिजचे सिमेंट काँक्रीटचे ब्रॅकेट घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन मोठ्या क्रेन्सचे सहाय्य घेतले जात आहे.
या क्रेन्सद्वारे प्रचंड आकाराचे सिमेंट काँक्रीटचे ब्रॅकेट्स एका ठिकाणाहून उचलून अलगद पुलाच्या ठिकाणी घातले जात आहेत. हे काम अत्यंत जोखमीचे असल्यामुळे खबरदारी म्हणून आज तिसरी रेल्वे गेट येथील खानापूर रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूने कांही काळ रोखून ठेवण्यात आली होती.
वाहने रोखण्यात आल्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाहने रोखण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली त्यामुळे तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
त्यामुळे तिसऱ्या रेल्वे गेटच्या अलीकडे थांबलेल्या वाहनचालकांनी काँग्रेस रोडमार्गे इच्छित स्थळी जाणे पसंत केले. रेल्वे ओव्हर ब्रिजचे ब्रॅकेट घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा वाहतुकीस खुला करण्यात आला.