फेसबुक वर 1लाख फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल बेळगांवातील मराठा समाजाचा मानबिंदू असणाऱ्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे “बेळगांव लाईव्ह” वेब न्यूज पोर्टलचे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील मराठा बँकेच्या कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार हे होते. बँकेचे चेअरमन पवार आणि संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते प्रकाश बेळगोजी आणि कॅमेरामन संजय चौगुले यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना संचालक बाळासाहेब काकतकर यांनी 1 लाख फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल बेळगांव लाईव्हचे अभिनंदन करून संपादक प्रकाश बेळगोजी यांच्या कार्याचा गौरव केला. बेळगोजी हे फक्त पत्रकार नसून एक तळमळीचे कार्यकर्ताप असल्याचे त्यांनी सांगितले. सीमाभागातील मराठी लोकांवर अन्याय होऊ नये सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून ते नेहमीच सहकार्य करत असतात. त्याचप्रमाणे रस्ते, वीज, पाणी आदी सर्व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील असतात.
निवडणूक काळातील त्यांची पत्रकारिता वाखाणण्याजोगी असते. मराठा बँक ही मराठा समाजाची बँक आहे त्यामुळे ती आणखी मोठी व्हावी यासाठी ते नेहमीच सहकार्याची भूमिका घेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बेळगांव लाईव्हचा प्रवास फक्त बेळगांव पुरता मर्यादित नसून जगभरात होत असतो असे सांगून त्यांनी आणखी जोमाने कार्य करून यशाची मोठमोठी शिखरे काबीज करावीत. मराठा बँक त्यांना नेहमी पाठिंबा देऊन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन बाळासाहेब काकतकर यांनी दिली.
संचालक सुनील अष्टेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोठ्या खडतर परिश्रमातून प्रकाश बेळगोजी यांनी हे यश मिळाल्याचे सांगितले. त्यांचे हे यश मराठा समाजासाठी भूषणावह आहे. त्यांना मराठा समाजातील संघ -संस्था आणि व्यक्तींनी पाठबळ देणे आवश्यक आहे. अतिशय तत्पर पत्रकारिता हे प्रकाश बेळगोजी यांचे वैशिष्ट्य असून यापुढे देखील अशीच समाज सेवा त्यांच्या हातून घडो, अशी शुभेच्छा अष्टेकर यांनी दिली.
याप्रसंगी मराठा बँकेचे व्हाईस चेअरमन मीना काकतकर संचालक शेखर हंडे, विनोद हंगिरगेकर, बँक व्यवस्थापक गजानन हिशोबकर तसेच अन्य संचालक आणि बँकेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. व्यवस्थापक गजानन हिशोबकर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केलं कौतुक
येळ्ळूर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनीही टीम बेळगाव live ने एक लाख फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केल्या बद्दल बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा सत्कार केला.