टिळकवाडी येथील रानडे रोड येथे एका जखमी अवस्थेतील वानराला बेळगांव ॲनिमल रेस्क्यू अँड केअर म्हणजेच बार्क या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे जीवदान मिळाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रानडे रोड, टिळकवाडी येथे एक वानर अर्थात मोठे माकड जखमी अवस्थेत असल्याचे पाहून तेथे नजीकच खेळत असलेल्या लहान मुलांनी स्वामी बेकरीचे राहुल देशपांडे यांना फोन करून ही माहिती दिली. त्यांनी त्वरित सदर माहिती बार्कच्या सागर छत्तरकी आणि सम्राट छत्तरकी यांना कळवली.
आपल्या कारगाडीसह ते दोघेही त्वरित रानडे रोड येथे पोचले. तेथेच जवळ राहणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर हे सुद्धा मदतीला धावून आले. कार्यकर्त्यांनी वनखात्यालासुद्धा वानराबद्दल माहिती दिली.
दरम्यान, बार्कचे कार्यकर्ते व दरेकर यांनी त्या जखमी वानराला पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार केले. उपचारानंतर कार्यकर्त्यांनी सदर वानराला वनखात्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी वनखात्याचे आरएफओ शिवानंद मगदूम, डेप्युटी आरएफओ विनय गौडर, वनरक्षक मंजुनाथ शिगीहळ्ळी आदी उपस्थित होते. रानडे रोड येथील लहान मुलांनी कौतुकास्पदरित्या प्रसंगावधान राखून कार्यकर्त्यांना कळविल्यामुळे त्या जखमी वानरावर वेळीच उपचार होऊन त्याचे प्राण वाचवणे शक्य झाले.