कोरोनाने मुलांना वैताग आणला हे जरी खरे असले तरी या कोरोना प्रादुर्भाव काळात मुलांच्या निर्मिती क्षमतेला धुमारे फुटले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे अंश राव हा विद्यार्थी होय. या मुलाने गॅरेजमधील टाकाऊ साहित्य (स्क्रॅप) संकलन करून चक्क कार तयार केली आहे.
आज टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा अनेक ठिकाणी घेतल्या जात असतात परंतु कार सुद्धा तयार केली जाते असे कोणाला वाटले नसेल. मात्र अंश राव याने ते सिद्ध करून दाखवले आहे. अंशला लहानपणापासूनच कार गाडीचे आकर्षण होते. त्याच्या खेळण्यात अनेक विविध प्रकारच्या कार गाड्यांचा समावेश आहे. अंश हा केएलई इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. लॉक डाऊनमध्ये अभ्यास नसल्याने त्याच्यापाशी विचार करायला भरपूर वेळ होता. त्यातूनच त्याला आपण कार तयार करून पाहूयात का? अशी कल्पना सुचली आणि अवघ्या एक महिन्यात त्याने टू सीटर इलेक्ट्रिक कार तयार केली.
कार तयार करायची हे पक्के झाल्यानंतर त्याने त्यासाठी विविध साहित्य संकलित करण्यास सुरुवात केली. अंशने विविध ठिकाणी जाऊन मोठ्या परिश्रमाने आपल्या कारला उपयुक्त असे टाकाऊ (स्क्रॅप) साहित्य जमा केले. त्यानंतर ते साहित्य एकत्र जोडून कार तयार करण्यासाठी मोठ्या प्रयासाने आवश्यक असणारे गॅरेज त्याने शोधून काढले.
त्याठिकाणी त्याने गेल्या जून ते जुलै या महिन्याभरात कार तयार केली. अंश राव याने डिझाईन केलेल्या या दोन आसनी इलेक्ट्रिक कारमध्ये त्यामध्ये रियर व्ह्यू मिरर नाही त्याऐवजी चक्क कॅमेरा आहे. शिवाय चोरांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्या कारमध्ये आलार्मची सोय आहे.
ही कार चार्ज करण्यासाठी 4 ते 5.5 तासाचा अवधी लागतो. अंशच्या या कार गाडीचा एव्हरेज ताशी 30 ते 40 किलोमीटर आहे. आता इलेक्ट्रिक ऐवजी सौर ऊर्जेचा (सोलार) वापर करून कारला रिचार्ज करता येते का? यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आहे अंश राव यांच्या या निर्मिती क्षमतेबद्दल केएलई इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या दीप्ती इंगळे आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे