शहरातील सदाशिवनगर येथे असलेले राज्याचे जलसंधारण मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे निवासस्थान सध्या “सुपर पॉवर स्टेशन”मध्ये परिवर्तित होत आहे.
आगामी बेळगांव लोकसभा पोटनिवडणूक आणि एकंदर राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर सदाशिवनगर बेळगांव येथील रमेश सावकार यांच्या निवासस्थानामध्ये होणाऱ्या बैठकांवर बैठका, मान्यवर नेतेमंडळींच्या गाठीभेटी, रमेश जारकीहोळी यांच्या वाढलेल्या नवी दिल्लीच्या वाऱ्या हे सर्व पाहता रमेश सावकारांचे निवासस्थान सध्या “सुपर पॉवर सेंटर” बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सदाशिवनगर येथे केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थाना शेजारीच जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे निवासस्थान आहे. सध्या या निवासस्थानामध्ये मुरुगेश निराणी, रेणुका आचार्य यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची उठबस सुरु झाली आहे. लिंगायत समाजाचे नेते माजी खासदार प्रभाकर कोरे व आमदार महांतेश कवटगीमठ यांनी देखील पालकमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
प्रभाकर कोरे यांनी आगामी बेळगाव लोकसभा निवडणुकीचे तिकीट आपल्याला मिळावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगानेच ते पालकमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे कळते.
या प्रकारच्या अनेक राजकीय घटना मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी घडत आहेत. त्यामुळेच हे निवासस्थान जणू भाजपचे सुपर पॉवर स्टेशन बनले आहे.