दिवाळी सण अवघ्या कांही दिवसांवर आला असल्यामुळे बेळगांवकर या सणाच्या तयारीला लागले असून उत्सवांची राणी असा मान मिळालेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी बेळगावची बाजारपेठ सज्ज झाली आहे.
पुढील आठवड्यात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होणार हे लक्षात घेऊन सलग तीन दिवस मिळालेल्या सुट्टीचा लाभ उठवत नागरिकांनी दिवाळीसाठीची खरेदी सुरू केली आहे. सलग तीन सुट्टी याचा लाभ उठवत बहुतांश नागरिकांनी घराची साफसफाई व रंगरंगोटीची कामे हातावेगळी केली आहेत. कोरोनाचे संकट टळेल आणि दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल, अशी आशा विक्रेते व्यापारी, दुकानदार यांच्याबरोबरच बेळगांवकरांनाही आहे. दिवाळी सणाच्या मुख्य प्रतीक असणाऱ्या पणत्या आणि आकाश दिवे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. सायंकाळनंतर आकाश दिव्यांच्या प्रकाशामुळे बाजारातील परिसर उजळून निघत आहे.
पांगुळ गल्ली गणपत गल्ली बेळगांव तसेच शहापूर, खडेबाजार, टिळकवाडीचा कांही भाग अनगोळ व वडगांव येथे पणत्या रांगोळी आणि आकाश दिवे यांची विक्री सुरू झाली आहे. खानापूर येथून पणत्या मागवल्या जात असून विक्रेत्यांकडे पारंपारिक पणत्याच उपलब्ध आहेत, तर महिलावर्गही सजावट करून त्यांना अधिक आकर्षक करून विक्री करत आहेत. मात्र प्रामुख्याने महिला ऑनलाइनच्या माध्यमातून आपल्या साहित्याची जाहिरात करत आहेत.
कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवले मात्र त्याची सुरुवात चीनमधून झाली त्यामुळे सध्या चीनबद्दल जनतेमध्ये असंतोष आहे. शिवाय हिंदू संघटनांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने यंदा प्रामुख्याने भारतीय अर्थात स्वदेशी उत्पादनांना मागणी मिळेल, असा अंदाज आहे.
आकाश दिव्यांच्या दरामध्ये फारसा फरक झाला नसून लहान दिवे 25 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत तर दारासमोर लावण्याचे मोठे आकाश दिवे साधारण 150 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. प्लास्टिक पेक्षा कागदी आकाश दिव्यांना वाढती मागणी आहे.