मच्छे पिरनवाडी ग्रामपंचायतीला आता लवकरच नगरपंचायतीचा दर्जा मिळणार आहे. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आली असून मुख्यमंत्री व नगरपंचायत खात्याने यांना संमती दर्शविली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याच बरोबर हिंडलगा आणि सांबरा यांना देखील नगरपंचायतीचा दर्जा देण्यात येणार होता. मात्र अजूनही त्याबाबत निर्णय झाला नाही. गेल्या काही महिन्यांपासून मच्छे व पिरनणवाडी ग्रामपंचायत नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली गतिमान करण्यात आल्या होत्या. मात्र आता याला मुहूर्त मिळाला आहे. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.
सध्या तात्पुरती घोषणा करण्यात आली असली तरी दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीचा कारभार पाहून याबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश यापूर्वी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले होते. कर्नाटक नगरपालिका कायदा 1964 अंतर्गत सरकारकडून पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून आता या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. या दोन्ही ग्रामपंचायत मधील खर्च यांचे ऑडिट प्रत दोन्ही गावचे नकाशे व चकबंदी तसेच लोकसंख्या आणि पन्नास टक्क्यांहून अधिक कृषी क्षेत्र वगळून नागरिक कोणत्या व्यवसाय करतात याबद्दल सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. आता या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.