एपीएमसी ते कंग्राळी खुर्दच्या रस्त्याचे कामकाज हाती घेऊन महिने उलटून गेले. परंतु अजूनही या रस्त्यांचे काम अर्धवट स्थितीत आहे. या रस्त्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा संबंधित प्रशासकीय कार्यालयातून निवेदने दिली आहेत.
परंतु हा रस्ता अजून जैसे थेच आहे. या रस्त्याचे कामकाज त्वरित पूर्ण करण्यात यावे, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा कंग्राळी खुर्द आणि श्री मार्कंडेय व्यायाम मंदीर कंग्राळी खुर्द यांच्यावतीने नागरिकांच्या सहयोगातून रास्त रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या बुधवारी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एपीएमसी समोर रास्ता रोको करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या रस्त्याच्या अर्धवट स्थितीतील कामकाजामुळे अनेक अडचणींचा सामना या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे. संपूर्ण पावसाळा उलटून गेला, चिखलाचे साम्राज्य पसरले, अनेक अपघात झाले, वाहनधारकांना तर दररोज या रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे.
परंतु प्रशासनाने मात्र याकडे डोळेझाक केली आहे. मागील वेळेस ग्रामीण आमदारांनी या रस्त्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परंतु ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशा पद्धतीने हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे.
हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, आणि जनतेच्या अडचणी सोडवून संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याचे कामकाज हाती घ्यावे यासाठी हा रास्त रोको करण्यात येणार आहे, अशी माहिती आर. आय. पाटील यांनी दिली असून या रास्तारोकोमध्ये स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.