जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागातील सेवा पुन्हा सुरु करण्यात याव्यात तसेच ऑपरेशन थेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, बेड्सची कमतरता असलेल्या ठिकाणी बेड्स उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच गरजू नागरिकांचे उपचाराअभावी होत असलेले हाल थांबविण्यास मदत करावी, असे निवेदन हेल्प फॉर नीडीचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी दिले. या निवेदनाची प्रत आरोग्य मंत्री के. सुधाकर, जिल्हाधिकारी बेळगाव आणि जिल्हा आरोग्याधिकाऱ्याना सादर करण्यात आली आहे.
सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान सर्वसामान्य आजार तसेच अतिदक्षता विभागातील रुग्णांना सेवा मिळणे मुश्किल झाले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ७०० हुन अधिक बेड्स उपलब्ध आहेत.
परंतु तरीही रुग्णांना सेवा मिळत नाही. 100 हुन कमी कोविड रुग्ण सध्या उपचार घेत असून संपूर्ण रुग्णालय उपलब्ध आहे. यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांना तातडीने सेवा मिळावी, आणि सर्वसामान्य आजारावरील रुग्णांनाही सेवा मिळावी. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना इतर रुग्णालयांचा खर्च परवडणारा नाही त्यामुळे अशा गरीब आणि गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा सुरु करण्यात यावी, यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.
या सर्व सेवा तातडीने सुरु कराव्यात अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा हेल्प फॉर नीडीचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी दिला आहे. हेल्प फॉर नीडीच्या माध्यमातून सुरेंद्र अनगोळकर यांनी अनेक गरजू नागरिकांना मदत केली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या समोर कित्येकवेळा त्यांनी रुग्णालय तसेच इतर गरजू नागरिकनांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी ऍम्ब्युलन्स सेवा पुरविण्यासहीत अनेक सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून केले जाते. सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांची होत असलेली परवड लक्षात घेऊन सुरेंद्र अनगोळकर यांनी आज हे निवेदन सादर केले आहे.
जिल्हा रुग्णालयात ओपीडी सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी अनेक संघटनांनी आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर पुन्हा सायंकाळी हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून करण्यात आली असून कोविड रुग्णांची घटत असलेली संख्या लक्षात घेता ही मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून ही समस्या त्वरित सोडविण्याची गरज आहे.