खोटेनाटे आरोप ठेवून एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या झारखंड येथील सामाजिक कार्यकर्ते फादर सॅटर्न स्वामी यांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी बेळगाव आणि परिसरातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने आज मंगळवारी सकाळी तोंडावर काळीपट्टी बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या झारखंड येथील सामाजिक कार्यकर्ते फादर सॅटर्न स्वामी यांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी आज शहर परिसरातील ख्रिश्चन बांधवांच्यावतीने राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर फादर सायमन फर्नांडिस व अन्य ख्रिस्ती समाज प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार रक्षक सॅटर्न उर्फ स्टॅन स्वामी त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या माओवाद्यांशी त्यांचा वैयक्तिक संबंध असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. मूळचे तामिळनाडूतील त्रिचीचे रहिवासी असलेले फादर स्टॅन स्वामी हे गेली पांच दशके झारखंडमध्ये आदिवासी लोकांच्या हक्क व अधिकारासाठी सातत्याने लढत आहेत. पोलिसांकडून दुर्बल आदीवासी समाजावर होणारा अन्याय व अत्याचाराविरूद्ध त्यांनी आवाज उठविला आहे.
सत्तेचा गैरवापर आणि योग्य कार्यपद्धतीचा अवलंब न करता जमिनी बळकावण्याच्या सरकारच्या कृतीला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. शांततापूर्ण मार्गाने भारतीय संविधानाची आपली बांधिलकी जपत आपला हा लढा सुरू ठेवणाऱ्या स्वामी यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबणे हा अन्याय आहे.
तेव्हा त्यांची तात्काळ निर्दोष सुटका करावी, अशा आशयाचा तपशील बेळगाव आणि परिसरातील ख्रिश्चन समाजाने सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. ख्रिश्चन समाज बांधवांतर्फे आज काढण्यात आलेल्या मूक मोर्चा मध्ये शहर परिसरातील बहुसंख्य ख्रिश्चन बांधव तोंडावर काळी पट्टी बांधून सहभागी झाले होते.