अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी यंत्रणेमुळेही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या आईप्रमाणे जपणाऱ्या जमिनीला कधी बायपासच्या नावाखाली तर कधी सरकारी योजनांच्या नावाखाली हडप करण्यात येते.
सौंदत्ती तालुक्यातील उळिळगेरी गावातील शेतकऱ्यांची अवस्थाही अशीच झाली आहे. सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे या शेतकऱ्यांच्या नावावर असलेली जमीन ही तांत्रिकदृष्ट्या खंदकामध्ये रूपांतरित केली गेली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप झाला असून याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
एकामागून एक संकटांचा सामना करणाऱ्या आम्ही शेतकऱ्यांनी नेमकी कोणती चूक केली आहे? का आम्ही शेतकरी आहोत हीच आमची चूक आहे? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. यांच्या नावाची तब्बल ३०० एकरहून अधिक जमीन सरकारच्या नावे असल्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवाय ही जमीन खंदक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झालेली ही चूक शेतकऱ्याना महागात पडत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे या जमिनीचा सर्व्हे करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.