रेशन वितरणातील गैरप्रकाराला आळा घालावा तसेच सरकारकडून आलेले आमच्या हक्काचे आणि चांगल्या प्रतीचे रेशन आम्हाला वेळेवर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कल्लेहोळ (सुळगा) येथील रेशनकार्ड धारकांनी केली आहे.
कल्लेहोळ (सुळगा) येथील रेशनकार्ड धारकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या उपसंचालकांकडे सादर केली आहे. कल्लेहोळ येथे रेशन (सरकारी स्वस्त धान्य) वितरण करताना पोत्यासहित धान्याचे वजन केले जात असल्यामुळे 500 ते 800 ग्रॅम रेशन कमी मिळत आहे.
आलेले रेशन सरकारी इमारतीत न ठेवता खाजगी जागेत ठेवले जात असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वयस्कर लोकांना अंगठा चालत नाही, असे सांगून रेशन न देता परत पाठविले जात आहे. रेशन वाटप वेळेवर करण्याऐवजी मनमानी पद्धतीने केले जात आहे. रेशन तीनच दिवस मिळेल असेही सांगितले जाते. त्यामुळे रेशन दुकानासमोर गर्दी होऊन लोकांची गैरसोय होते आहे.
जमिनीवर ओतलेले आणि पायदळी तुडविलेले केरकचरा मिश्रित धान्य लाभार्थींना वितरीत केले जाते. कामाच्या व्यापामुळे बऱ्याच जणांना ठरावीक तीन दिवसात रेशन घेणे जमत नाही, अशा लोकांना संबंधित महिन्याचे रेशन मिळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले जाते.
सरकारी रॉकेल वितरणात देखील हाच प्रकार केला जातो. या सर्व प्रकारांमुळे लोकांची गैरसोय होत आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कल्लेहोळ (सुळगा) येथील रेशनकार्ड धारकांना वेळेवर त्यांच्या हक्काचे आणि चांगल्या प्रतीचे रेशन मिळण्याची व्यवस्था करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.