गेल्या 16 वर्षांपासून खानापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात काम करत सलग चौथ्यांदा डी सी सी बँकेवर निवडून गेलेले माजी आमदार अरविंद पाटील यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी चर्चिले जात आहे.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पड्ल्या असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.
१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार असून दुपारी ३ वाजता संचालक मंडळाची सभा सुरु होणार आहे. नामनिर्देशन पात्र माघार घेण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रमेश कत्ती यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अरविंद पाटील यांच्यासह उपाध्यक्षपदी महांतेश दोड्डगौड, शिवानंद डोणी, यांचीही नावे चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे नुकताच झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झालेले अरविंद पाटील यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी चर्चेत आले आहे.माजी आमदार अरविंद पाटील यांच्याबाबत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी वक्तव्य करत लवकरच ते भाजपात येतील असं म्हटलं होतं त्यावर अद्याप अरविंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी चर्चिले जाऊ लागले आहे.