Tuesday, April 30, 2024

/

स्मार्ट सिटीची कामे रामभरोसे?: दगडमातीचा ढिगारा कोसळून 12 दुचाकींचे नुकसान

 belgaum

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टिळकवाडी येथील कलामंदिराच्या ठिकाणी नूतन संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणचा दगडमातीचा ढिगारा अचानक कोसळल्यामुळे 12 दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ही घटना घडली तेंव्हा आसपास कोणीही नसल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.

बेळगांवात स्मार्ट सिटी योजना राबविण्यास चांगला मुहूर्त मिळाला नाही की काय कोणास ठाऊक परंतु या योजनेला प्रारंभ झाल्यापासून शहरवासियांना स्वच्छ -सुंदर बेळगावाऐवजी मनस्तापाशिवाय काहीही मिळालेले नाही. स्मार्ट सिटीची ठीकठिकाणची निकृष्ट आणि अर्धवट अवस्थेतील विकासकामं तर टीकेचा विषय बनलेलीच आहेत. या अर्धवट अवस्थेतील विकासकामांमुळे आतापर्यंत तिघा निष्पाप नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. हे सर्व प्रकार पाहता स्मार्ट सिटीच्या कामांवर कोणाचे लक्ष आहे की नाही? की सर्व कामे रामभरोसे सुरू आहेत? असा संतप्त सवाल आज सोमवारी टिळकवाडी कलामंदिर येथे घडलेल्या घटनेनंतर केला जात आहे.Bike damages

 belgaum

टिळकवाडी येथील कला मंदिरच्या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भव्य संकुल उभारले जाणार आहे. या संकुलाचे बांधकाम सध्या सुरू आपल्यामुळे या जागेच्या चारही बाजूला उंच पत्रे मारून आडोसा निर्माण करण्यात आला आहे. या पत्रांना लागून आतल्या बाजूला खणण्यात आलेल्या दगडमातीचा ढिगारा टाकण्यात येत होता. एके ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात दगडमातीचा ढिगारा टाकण्यात आला होता की त्याचा भार न पेलल्याने आज दुपारी चारच्या सुमारास आडोशाचे पत्रे उन्मळून तो ढिगारा बाहेरील बाजूस रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 12 दुचाकींवर कोसळला.

सदर घटना घडताच आसपासच्या लोकांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर महत्प्रयासाने गाडली गेलेली सर्व दुचाकीवाहने ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्या. टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दगड मातीचा ढिगारा ज्यावेळी कोसळला त्यावेळी क्षतीग्रस्त दुचाकींनजीक सुदैवाने कोणीही नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या घटनेत जवळपास सर्व दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून सदर दुचाकी ठेकेदाराने दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.