कर्नाटकातील भाजप प्रणित सरकारने मराठा विकास प्राधिकरण स्थापन केले. मराठा या जातीत मोडणाऱ्या कर्नाटकातील सर्व भाषिक व्यक्तींसाठी हे प्राधिकरण असेल. यावरून निर्माण झालेला वाद शमत नाही असेच वातावरण सध्या आहे.
सीमाभागातील मराठी भाषिक मराठांनी याला आपला विरोध करून आपली भूमिका स्पष्ट केलेली असताना कन्नड संघटना आणि राजकीय पक्षही विरोध करीत आहेत. कर्नाटक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनीही आपला विरोध दर्शविला आहे त्यामुळे मराठा विकास प्राधिकरण वरून राजकारण तापले असल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारने जनतेच्या कल्याणासाठी काम करावे.धर्म आणि जातीच्या नावाखाली प्राधिकारणे स्थापन करणे चुकीचे आहे.घटनेने सर्व जाती धर्मांचा पुरस्कार केला आहे. सर्वच जातींचा आदर राखणे घटनेच्या तरतुदीत आहे. समान भावनेतून सर्वांचा विचार व्हायला हवा, असे डी के शिवकुमार यांनी म्हटले आहे.
भाजप सरकारने आत्ताच मराठा प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय का आणि कशासाठी घेतला? इतके दिवस या जातिकडे दुर्लक्ष होतं का? सर्व जातींना समान रीतीने वागविल्यास आम्ही नक्कीच या निर्णयाचे समर्थन केले असते असेही डी के शिवकुमार यांनी म्हटलं आहे.
भाजपने आज पर्यंत सर्व जातींना फोडण्याचं काम केलं आहे. इतर जातींना नाराज करण्याचे त्यांचे धोरण आहे. मात्र याला आमचा विरोध आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.