बेळगांव कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील ओल्ड ग्रँड बंगल्यातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या समितीमध्ये आम्हा सदस्यांना सहभागी केले जाऊ नये, अशी विनंती वजा मागणी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांनी केली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर सदस्य साजिद शेख आदींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांना सादर करण्यात आले. कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड ग्रँड बंगले हस्तांतर करून घेण्याचा प्रयत्न 2016 मध्ये झाला होता 14 बंगले हस्तांतर करून घेण्यासाठी म्हणून बोर्डाने प्रयत्न चालवले होते. मात्र बंगले धारक असोसिएशनच्यावतीने हस्तांतरण प्रक्रियेला जोरदार विरोध केल्यानंतर ही कारवाई थांबली होती.
मात्र आता पुन्हा ओल्ड ग्रँड बंगल्यांचे अनधिकृत बांधकाम सर्वेक्षणाच्या नांवाखाली बंगले हस्तांतर करून घेण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाने हालचाली चालविल्याचा बंगले मालकांचा आरोप आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेवर अन्याय होऊ न देणे हे आमचे कर्तव्य आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील बंगल्यांचे सर्वेक्षण आणि हस्तांतरणास नागरिकांचा विरोध आहे. तेंव्हा ओल्ड ग्रँड बंगल्यातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाबाबत माहिती घेण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या समितीमध्ये बोर्डाच्या सदस्यांचा समावेश केला जाऊ नये, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी उपाध्यक्ष अष्टेकर आणि साजिद शेख यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य डॉ मदन डोंगरे, अल्लाउद्दीन किल्लेदार, रिजवान बेपारी, अरेबिया धारवाडकर आणि विक्रम पुरोहित उपस्थित होते.