बेळगावमध्ये अनेक प्रतिभावान तरुण आहेत. अनेक तरुणांनी आपला डंका देशाच्या अत्युच्च पदावर गाजविला आहे. अनेक तरुणांनी देशासोबतच परदेशातही बेळगावचे नाव उज्वल केले आहे. यापैकीच एक म्हणजे अभिषेक दत्ता जाधव. केळकर बाग येथील दत्ता जाधव यांचा सुपुत्र अभिषेक जाधव या तरुणाने बेळगावमधून थेट दिल्ली गाठत स्वतःचे स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले आहे. देशातील अनेक राज्यातील खासदारांचा रिमोट कंट्रोल चे कार्य पार पाडणाऱ्या अभिषेक जाधव या तरुणाशी ‘बेळगाव Live’ ने केलेली खास बातचीत!
राजकारण हा विषयच गुंतागुंतीचा आहे. प्रत्येकाला सहजपणे समजतोच असा कोणताही मुद्दा राजकारणात नाही. जितकं आपण आत जाऊ तितकंच गूढ राजकारणात वाढत जातं. त्यातही दिल्लीच्या राजकारणात प्रवेश घ्यायचा तर यासाठी उत्तम अभ्यासाची गरज आहे. बेळगाव मधून दिल्ली गाठत यूपीएससी चा अभ्यासक्रम शिकता शिकता मास्टर इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ची पदवी प्राप्त करणाऱ्या अभिषेक जाधव या तरुणाने वयाच्या १४ व्या वर्षीच संसदेच्या कामकाजात भाग घ्यायला सुरुवात केली होती.
राजकारणाची अत्यंत ओढ असणाऱ्या तरुणाने आपले प्राथमिक शिक्षण वनिता विद्यालय येथे घेतले असून गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण तर जैन महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. २०१२ साली उच्च शिक्षणासाठी दिल्लीत राहून मास्टर इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हि पदवी प्राप्त केली आहे. यासोबतच यूपीएससीची तयारीही या तरुणाने केली आहे. सध्या दिल्लीमध्ये राहून अनेक राज्यातील खासदारांना संसदेच्या कामकाजात सल्ला सेवा पुरविण्याचे काम या तरुणाच्या माध्यमातून केले जात आहे.
सहसा दिल्लीतील कामकाज हे एनसीआर भागातील लोकांकडून केले जाते. परंतु बेळगावसारख्या छोट्या शहरातून दिल्लीमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत ‘कंपास’ नावाची एक संस्था या तरुणाने उभी केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक खासदारांना संसदेच्या अधिवेशनात मुद्देसूद गोष्टी मांडण्यासाठी तसेच अधिवेशनानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विविध योजना खासदारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे तंत्र खासदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येतं.
‘कंपास’ (compass)म्हणजेच ‘कमिटी फॉर पार्लिमेंटरी असिस्टंस’ (committee for parlimentary assistance). या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात अशा विविध राज्यातील १२ खासदारांना संसदीय अधिवेशन आणि अधिवेशनाव्यतिरिक्त खासदारांच्या मतदारसंघातील प्राधान्य द्यावयाच्या गोष्टींचे कामकाज पहिले जाते. संसदेच्या अधिवेशनात कोणत्याही पद्धतीच्या माहिती मांडणीपासून शून्य प्रहर (झिरो हवर), चर्चा – उपचर्चा, बिल्स, ३७७, अशा अनेक गोष्टींसाठी मोफत मदत पुरविली जाते. ‘कंपास’ या संस्थेत अभिषेक जाधव हे फाउंडर सीईओ म्हणून कार्यरत असून यांच्यासह या संस्थेमध्ये ८ जण काम करतात. केवळ खासदार आणि राजकारण्यांनाच नाही तर राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘इमेज बिल्डिंगचे’ धडे कंपासच्या माध्यमातून दिले जातात.
२०१२ मध्ये संसदेच्या कामकाजाची माहिती घेणाऱ्या या तरुणाने सुरुवातीच्या काळात ५ खासदारांना सल्ला देण्याचे काम केले आहे. यासोबतच एस्सेल आणि झी ग्रुपचे संस्थापक आणि खासदार सुभाषचंद्रा यांचे सल्लागार म्हणूनही अभिषेक जाधव काम पाहतात. रशियाचे राजदूत यांच्यासोबतही या तरुणाला काम करण्याची संधी मिळाली असून रशियाच्या दूतावासात कार्य करत असताना ‘बिझनेस आणि कल्चरल डेलिगेशन’ ही उत्तमरीत्या सांभाळले आहे. रशिया आणि चायनीज भाषा अवगत अभिषेक जाधव यांना अवगत आहेत. बेळगावसारख्या शहरातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या या अवलियाला ‘बेळगाव Live’ कडून पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.