बेळगाव जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या जिल्ह्याचे विभाजन करण्याची चर्चा रंगत आहे. अशातच कर्नाटक राज्य मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री हे बेळगाव जिल्ह्यातील असल्याचेही निदर्शनास आले आहे.
चार मंत्रिपदासह उपमुख्यमंत्रीपद त्याचप्रमाणे विविध निगम मंडळांचे अध्यक्षस्थाही बेळगावमधीलच आहे. परंतु बेळगावमधील नेते हे मंत्रिमंडळात असूनही बेळगावचा विकास म्हणावा तितका झालेला दिसून येत नाही.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे बेळगांववरील प्रेम, किंवा बेळगांव जिल्ह्यातील भाजप नेत्यांचे नशीब यापैकी कोणताही गोष्ट आहे ज्यामुळे बेळगांव जिल्ह्याला बंपर लॉटरी लागली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. लवकरच मंत्रिमंडळ पुनर्रचनाही होणार आहे. यावेळी बेळगावमधील आणखी किती जणांची वर्णी मंत्रिमंडळात लागते हे पाहणे उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री पदी असलेले अथणी तालुक्यातील लक्ष्मण सवदी असोत किंवा कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील असोत..पालकमंत्री रमेश जारकीहोळी असोत अशा अनेक दिग्गज मंडळींची वर्णी मंत्रिमंडळात असूनही बेळगावचा विकास मात्र अजूनही मर्यादित स्वरूपाचा आहे, हे बेळगावचे दुर्दैव म्हणावे लागेल.