कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या सहाव्या संघाच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण निगमचे पथसंचलन होणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमाला गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती केएसआरपी द्वितीय कमांडंट हंजा हुसेन यांनी दिली.
सोमवारी वार्ता विभागाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंगळावर दिनांक १ डिसेंबर रोजी एपीएमसी मार्गावरील केएसआरपी प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत पथसंचलन होणार असून या कार्यक्रमात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही सहभाग घेणार आहेत. यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण सूद, केएसआरपीचे एडीजीपी आलोक कुमार यांच्यासह अनेक नेतेही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजता केएसआरपी एडीजीपी आलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सायकल फेरी सुवर्णसौधपासून सुरु होणार असून अशोक चौक, आरटीओ सर्कल येथून चन्नम्मा चौकात येणार आहे. राणी चन्नम्मांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून
पिरनवाडीकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.
मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत मच्छे येथीही कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या आवरणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात केएसआरपी एडीजीपी आलोककुमार हे सहभाग घेणार आहेत.
कोरोनाकाळात सेवा बजाविणाऱ्या ७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला होता. यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाला होता. या मृताच्या कुटुंबियांना ३० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.