1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव दिनाच्या विरोधात काळा दिन पाळताना दुर्दैवाने एखादी अनुचित घटना घडली किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला युवा समिती बेळगाव थेट जबाबदार राहील, असा इशारा पोलीस खात्याने एका नोटीसद्वारे दिला आहे. लोकशाही च्या माध्यमातून लढा करणाऱ्या युवकांना नोटीस देत पोलिसांनी एक प्रकारे दडपशाही चालवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे केंद्र सरकारच्या विरोधात उद्या रविवारी 1 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगांवसह सीमाभागात काळा दिन पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याकडून म. ए. समितीचा भाग असलेल्या युवा समितीला नोटीसद्वारे सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
1 नोव्हेंबर राज्योत्सव दिनाच्या विरोधात काळा दिन पाळताना दुर्दैवाने एखादी अनुचित घटना घडली किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला आपण थेट जबाबदार असाल. स्थानिक पोलिसांच्या परवानगीशिवाय मिरवणूक, मेळावा अथवा मोर्चाचे आयोजन करता येणार नाही. राष्ट्रीय अथवा राज्य महामार्गावर अडथळे आणू नयेत. या मार्गावरील सुरळीत वाहतुकीला बाधा आणू नये, तसे झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. निषेध व बंद दरम्यान कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर घोषणा देऊ नयेत.
निषेध नोंदविण्यासाठी कोणतीही दुकाने जबरदस्तीने बंद करू नयेत. सायकलस्वारांनी काळी वस्त्रे परिधान करू नयेत आणि बॅनर वापरू नये, अशा सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. केरळ राज्यातील वादाचा आणि तेथील मार्टिन कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देऊन उपरोक्त सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांकडून “काळा दिन” पाळला जाऊ नये, त्यात अडथळा निर्माण व्हावा यासाठीच हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.